विद्यार्थी म्हणताहेत, ‘वुई आर द बेस्ट!’

By admin | Published: January 11, 2015 01:37 AM2015-01-11T01:37:18+5:302015-01-11T01:37:18+5:30

नव्या युगाचे गाणे ओठावर असलेल्या या पिढीकडे विलक्षण नॉलेज आणि कोणत्याही परीक्षेला तोंड देण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे.

Students are saying, 'we are the best!' | विद्यार्थी म्हणताहेत, ‘वुई आर द बेस्ट!’

विद्यार्थी म्हणताहेत, ‘वुई आर द बेस्ट!’

Next

धर्मराज हल्लाळे - नांदेड
गॅझेट्शी दोस्ती, गुगलशी मैत्री आणि टेक्नोसॅव्ही असलेल्या आजच्या स्टुडंट्सना कमी लेखू नका... नव्या युगाचे गाणे ओठावर असलेल्या या पिढीकडे विलक्षण नॉलेज आणि कोणत्याही परीक्षेला तोंड देण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे. त्यामुळे ‘काठिण्य पातळी’चा बाऊ करून रद्द केलेली वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेसाठीची नकारात्मक गुणदान पद्धत पूर्ववत चालू ठेवा, असा आग्रह विद्यार्थ्यांनी धरला आहे. स्पर्धात्मक युगात स्वत:चा ठसा उमटवू इच्छिणाऱ्यांचा हा आग्रह सरकारने मान्य करायला हवा!
वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेसाठी लागू असलेली नकारात्मक गुणदान पद्धत रद्द करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण खात्याने नुकताच घेतला आहे. त्यास विद्यार्थी-पालकांनी कडाडून विरोध दर्शविला आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा आता ७२० गुणांची होणार आहे़ त्यात एकूण प्रश्न १८० व त्याला प्रत्येकी ४ गुण असे स्वरूप असेल़ २०१४ मध्येही ७२० गुणांचीच परीक्षा झाली होती़ परंतु चुकलेल्या प्रत्येक उत्तरामागे विद्यार्थ्याने मिळविलेल्या एकूण गुणांतून एक गुण कमी होत असे़ त्यामुळे परीक्षा पद्धतीत काटेकोरपणा होता़ परंतु नव्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या सूक्ष्म अभ्यासाला विशेष वाव नाही. देशपातळीवरील परीक्षांत नकारात्मक गुणदान असते. त्यामुळे विद्यार्थी संबंधित विषयाचा सखोल अभ्यास करतात.
या अनुषंगाने नांदेड, परभणी व लातूर जिल्ह्यांतील एकूण १,८७१ विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातून समोर आलेली आकडेवारी शासनाला निर्णयाचा फेरविचार करायला लावणारी आहे़ नांदेडच्या यशवंत महाविद्यालयातील ५८० विद्यार्थ्यांनी तर लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयातील ६३१ विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणात सहभाग नोंदविला़ तसेच परभणी येथील डॉ़ हुलसुरे फाउंडेशन व नांदेडच्या युथीमने स्वतंत्रपणे ६६० विद्यार्थ्यांची मते नोंदविली़

असे झाले सर्वेक्षण.... ‘लोकमत’ने तीन जिल्ह्यांतील निवडक विद्यार्थ्यांचे संस्था, प्राचार्य, शैक्षणिक कार्यकर्ते यांच्या मदतीने सवर््ेक्षण केले. गेल्या तीन वर्षांपासून मेडिकल सीईटी सातत्याने वाद आणि चर्चेचा विषय ठरली आहे. राज्यातील दीड लाख विद्यार्थ्यांशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर मांडलेला हा लेखाजोखा.

सीईटी १० दिवस पुढे ढकला : आॅल इंडिया प्री-मेडिकल टेस्ट (एआयपीएमटी) येणाऱ्या ३ मे रोजी होणार आहे़, तर सीईटी ७ मे रोजी आहे़ एआयपीएमटीची परीक्षा मुंबई, ठाणे, नागपूर या ठिकाणी होते़ त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी या दोन्ही परीक्षांमध्ये किमान १०-१५ दिवसांचे अंतर राहावे, यासाठी सीईटी १० दिवस पुढे ढकलावी, अशी मागणी आहे.

अभ्यासाचे नियोजन बिघडले
सीईटी, एनईईटी, पुन्हा सीईटी, त्यात अभ्यासक्रमाचा गोंधळ, यापूर्वी नकारात्मक गुणदान पद्धत, आता ती रद्द या बदलांचा प्रचंड मानसिक ताण येत असल्याचे ३०८ विद्यार्थ्यांनी सांगितले़ १७२ विद्यार्थ्यांना या प्रकाराची अनामिक भीती वाटत राहते़ तर १,३७८ (७३.६५ टक्के) विद्यार्थी अभ्यासाचे नीटसे नियोजन करू शकत नाहीत़ एकूणच स्पर्धेसाठी, उच्च काठिण्य पातळीसाठी विद्यार्थी सज्ज आहेत, तर शासन अन् यंत्रणेचाच गोंधळ अधिक आहे.

ही पद्धत हवीच
देशपातळीवर स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना स्थान मिळवायचे असेल तर नकारात्मक गुणदान पद्धत असलीच पाहिजे़ त्यामुळे शासनाने निर्णयावर फेरविचार करावा, अशी भूमिका शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांनी मांडली.

नुकसान करणारा निर्णय
सीईटी परीक्षेत नकारात्मक गुणदान पद्धत रद्द करणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या सूक्ष्म अभ्यासाला नाकारण्यासारखे आहे़ अंदाजावर उत्तरे देऊन महत्त्वाचे वैद्यकीय क्षेत्र काबीज करता येणार नाही़ शिवाय देशपातळीवरील परीक्षांमध्येही महाराष्ट्राचे विद्यार्थी अपयशी ठरतील,
त्याला वैद्यकीय शिक्षण खात्याचा निर्णय कारणीभूत ठरेल, असे मत नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ एऩ व्ही़ कल्याणकर यांनी व्यक्त केले़

विद्यार्थ्यांचे म्हणणे काय?
शिक्षण क्षेत्रातील निर्णय लोकानुनय करण्यापेक्षा गुणवत्तेला प्राधान्य देणारे असावेत़ विद्यार्थ्यांचे हित पाहायचे असेल तर त्यांची मते लक्षात घ्यावीत, असे हुलसुरे फाउंडेशनचे डॉ़ मारोती हुलसुरे यांनी सांगितले़ तर युथीमचे प्रा़ गणेश चौगुले म्हणाले, की विद्यार्थ्यांनी नोंदविलेली निरीक्षणे शासनाने लक्षात घ्यावीत़ विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला रोखले जाणार नाही, याचा विचार निर्णय घेताना केला पाहिजे़

Web Title: Students are saying, 'we are the best!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.