‘त्या’ आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे अद्याप समायोजन नाही
By admin | Published: November 8, 2016 04:57 AM2016-11-08T04:57:11+5:302016-11-08T04:57:11+5:30
अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पाळा येथील आदिवासी आश्रमशाळेची मान्यता तात्काळ रद्द करण्यात आली.
गणेश मापारी, खामगाव (जि. बुलडाणा)
अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पाळा येथील आदिवासी आश्रमशाळेची मान्यता तात्काळ रद्द करण्यात आली. मात्र शाळेतील ३८८ विद्यार्थ्यांचे अद्याप दुसऱ्या शाळेमध्ये समायोजन करण्यात आलेले नाही. दिवाळीच्या सुटीनंतर बुधवारी शाळा सुरू होणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकरणात १७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकासह शिक्षक व शिक्षकेत्तर ८ कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून सोमवारीही आणखी दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. दोषींना निलंबित करण्यासोबत या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे विविध आदिवासी शाळांमध्ये त्वरित समायोजन करण्यात येईल, असे आश्वासन आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिले होते. मात्र समायोजनासाठी दुसरी शाळाही अद्याप निश्चित झालेली नाही. त्यामुळे ३८८ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.
आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मूळ गावी वेगवेगळी पथके पाठविली असून विद्यार्थ्यांच्या पसंतीनुसार त्यांचे आदिवासी शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. या प्रक्रियेला बराच अवधी लागण्याची शक्यता आहे.