आॅस्ट्रेलियातील विद्यार्थी घेणार गोसंवर्धनाचे धडे, भारतीय पशूंचा करणार अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 02:38 AM2017-09-06T02:38:49+5:302017-09-06T02:39:18+5:30
कथित गोरक्षकांच्या आकांतामुळे देशभरातील राजकीय वातावरण तापले आहे. याचा फटका मात्र गोरक्षक आणि त्यावर संशोधन करणा-यांना नेहमीच बसला आहे.
जितेंद्र ढवळे
नागपूर : कथित गोरक्षकांच्या आकांतामुळे देशभरातील राजकीय वातावरण तापले आहे. याचा फटका मात्र गोरक्षक आणि त्यावर संशोधन करणा-यांना नेहमीच बसला आहे. मात्र भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील गार्इंचा आणि इतर पशूंचा विकास करण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धन कार्यक्रमाला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने महत्त्वाकांक्षी पाऊल टाकत आॅस्ट्रेलिया येथील अॅडिलेड विद्यापीठासोबत सामंजस्य करार करण्याचा संकल्प केला आहे. हा करार अंतिम टप्प्यात असून तो भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने (माफसू) संशोधन क्षेत्र आणि त्याच्या कार्यपद्धती यात आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला. जगभरात पशु आणि मत्स्य विज्ञान शाखेत जे काही चांगले संशोधन होत आहे ते महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे. याचा येथील कृषी आणि कृषिपूरक व्यवस्थेला फायदा व्हावा यासाठी विद्यापीठात येत्या काही काळात संशोधनाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे. याचाच एक भाग अॅडिलेड विद्यापीठाशी होणारा करार आहे. या करारानुसार अॅडिलेड विद्यापीठातील शिक्षक आणि संशोधक विद्यार्थी माफसूच्या मदतीने भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील गार्इंचा, पशूंचा आणि मत्स्य प्रजातींचा अभ्यास करतील. या क्षेत्रात त्यांच्याकडे होणाºया संशोधनाची माहिती भारतीय शिक्षक आणि संशोधक विद्यार्थ्यांना सांगतील. याच मालिकेत माफसूचे विद्यार्थी आॅस्ट्रेलियात जाऊन तेथील पशुसंवर्धन-दुग्धविकास आदी बाबींचा अभ्यास करेल. या दोन्ही विद्यापीठांच्या शैक्षणिक आदानप्रदानामुळे महाराष्ट्रातील पशुसंवर्धन आणि दुग्धविकास प्रकल्पांना बळकटी मिळेल. यासोबत आपले संशोधक आणि शिक्षक अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी अवगत होतील.