‘लोकमत’च्या संस्काराचे मोती उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद
By admin | Published: June 29, 2017 07:39 AM2017-06-29T07:39:19+5:302017-06-29T11:46:31+5:30
मुलांसाठी मनोरंजनातून हसतखेळत ज्ञानाचा खजिना खुला व्हावा या हेतूने दै. ‘लोकमत’मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘संस्कारांचे मोती’ हे विशेष पान प्रसिद्ध होत आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - जागतिकीकरणाच्या आजच्या युगात स्वत:चे अस्तित्व सिद्ध करायचे असेल तर मुलांना शैक्षणिक गुणवत्तेच्या स्पर्धत सहभागी व्हावेच लागणार. चांगले गुण मिळवण्यासाठी अथक परिश्रमपूर्वक अभ्यास करावाच लागणार. पण या अभ्यासासोबतच मुलांचे मनोरंजन व्हावे आणि याच मनोरंजनातून हसतखेळत ज्ञानाचा खजिना त्यांच्यापुढे खुला व्हावा या हेतूने दै. ‘लोकमत’मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘संस्कारांचे मोती’ हे विशेष पान प्रसिद्ध होत आहे.
२७ जूनपासून सुरू झालेल्या या विशेष पानात सामान्य ज्ञान, खेळ, जगातील स्मार्ट शहरांची माहिती, भाषा ज्ञान वाढवणारे कोडे, अभ्यासासाठी उपयुक्त आॅनलाईन साईट्सची माहिती असे बरेच काही आहे. त्यामुळेच या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांकडून मिळणारा हा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता आता या उपक्रमाअंतर्गत स्पर्धेचे आयोजन करून हवाई सफर, प्रमाणपत्र यासह आकर्षक बक्षीसे जिंकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा विनामूल्य आहे. दै. लोकमतमध्ये ‘संस्काराचे मोती’ या विशेष पानामध्ये प्रसिद्ध होणारी कुपन्स कापून त्याची चिकटवही तयार करून विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. १ जुलै ते १० आॅक्टोबर २०१७ असा या स्पर्धेचा कालावधी आहे. या कालावधीत दै. ‘लोकमत’मध्ये ‘संस्काराचे मोती’ या पानावर रोज एक कूपन देण्यात येईल.
दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी हे कूपन कापून शाळांमधून वाटप करण्यात येणाऱ्या किंवा दै. ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या प्रवेशिकेतील चौकटीत चिकटवायचे आहे. प्रथम क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकाला रिमोट कंट्रोल ट्रान्सफॉर्मर कार, दुसऱ्या विजेत्यास सॅक तर तृतीय क्रमांकाच्या विजयी स्पर्धकाला लंच बॉक्स देण्यात येईल. याशिवाय जिल्हानिहाय एका विद्यार्थ्यास हवाई सफरीची संधी मिळणार आहे. सोबतच उत्तेजनार्थ बक्षीसे व स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला विशेष प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल.