विद्यार्थ्यांची ‘सीईटी’लाच अधिक पसंती
By admin | Published: April 3, 2017 05:46 AM2017-04-03T05:46:05+5:302017-04-03T05:46:05+5:30
वैद्यकीय आणि अभियांत्रिकी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांनी चांगलाच धसका घेतला
मुंबई : वैद्यकीय आणि अभियांत्रिकी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. ‘नॅशनल एलिजिब्लिटी एन्ट्रन्स टेस्ट’चा (नीट) अनेक विद्यार्थ्यांनी ताण घेतला आहे. त्यामुळे नीट आणि जेईईऐवजी सीईटीलाच अनेकांनी पसंती दिल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सीईटीला अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही ४५ टक्क्यांनी वाढली आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यासाठी आता राष्ट्रीय पातळीवर एकच परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा सीबीएसईतर्फे घेतली जाते. त्यामुळे राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम कठीण वाटतो. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाऐवजी आता काही विद्यार्थ्यांनी इंजिनीअरिंगमध्ये करिअर करायचा विचार केला आहे, पण तिथेही काही प्रमाणात जेईईचा अडसर वाटतो. कारण या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे इथेही धोका आहेच. त्यामुळे आधीपासून सुरू असलेली राज्याची सीईटी देण्याचा निर्णय अनेक विद्यार्थ्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांनी सीईटीला अर्ज भरले आहेत, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. (प्रतिनिधी)
>कधी होणार सीईटी?
११ मे रोजी सीईटी परीक्षा होणार आहे. या परीक्षेचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना २४ एप्रिल ते ११ मेपर्यंत संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.