कागदपत्रे तपासणीत विद्यार्थी उदासीन
By admin | Published: June 10, 2017 03:12 AM2017-06-10T03:12:35+5:302017-06-10T03:12:35+5:30
अकरावी इयत्तेच्या प्रवेशासाठी आॅनलाइन नोंदणी प्रक्रियेस सुरुवात झाली असून, सुमारे ८५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी शुक्रवारपर्यंत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावी इयत्तेच्या प्रवेशासाठी आॅनलाइन नोंदणी प्रक्रियेस सुरुवात झाली असून, सुमारे ८५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी शुक्रवारपर्यंत अर्जाचा पहिला भाग भरलेला आहे. मात्र या अर्जात कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या ९० टक्के विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज मंजूर होण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची तपासणी केलेली नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना अर्जाचा निकाल लागल्यानंतर अर्जाचा दुसरा भाग भरता येणार नसल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सांगतिले.
मुंबई महानगर क्षेत्रामधील महाविद्यालयांतील अकरावी आॅनलाइनसाठी एकूण २ लाख ९२ हजार ०९० जागा उपलब्ध आहेत. या जागांमध्ये कला, क्रीडा, शारीरिकदृष्ट्या अपंग, प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त अशा विविध आरक्षणांसह अनुसूचित जाती व जमाती तसेच विशेष व इतर मागास प्रवर्गांसाठी राखीव जागा असतात. या जागांसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना संबंधित सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आणि कागदपत्रांची आवश्यकता असते. ही कागदपत्रे विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून किंवा मार्गदर्शन केंद्रातून तपासून घ्यावी लागतात. संबंधित कागदपत्रांची खातरजमा केल्यानंतरच अर्जाचा पूर्ण भरलेला पहिला भाग मंजूर केला जातो. त्यामुळे ही प्रक्रिया लांबली आहे.
पुढील आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी किमान अकरावी आॅनलाइन प्रक्रिया अर्जाचा पहिला भाग भरणे अपेक्षित आहे. कारण दहावीचा निकाल लागल्यानंतर अर्जाचा दुसरा भाग भरण्यास खुला केला जाईल. अशा परिस्थितीत ज्या विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची तपासणी पूर्ण केली असेल, त्यांनाच तत्काळ अर्जाचा दुसरा भाग भरण्यास परवानगी मिळणार आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी निकालाची प्रतीक्षा न करता तत्काळ कागदपत्रांची तपासणी करण्याचे आवाहन प्रशासनाने
केले आहे.