दहावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना दिलासा
By admin | Published: June 16, 2016 03:13 AM2016-06-16T03:13:01+5:302016-06-16T03:13:01+5:30
राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर खेळलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत पाच टक्के वाढीव गुण व स्पोर्ट कोट्यातून प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास १७ जूनपर्यंत
मुंबई : राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर खेळलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत पाच टक्के वाढीव गुण व स्पोर्ट कोट्यातून प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास १७ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. स्पोर्ट क्लबचे प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रे सादर करण्यास बोर्डाने २० मेपर्यंत मुदत दिली होती. मात्र उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर ही मुदत वाढवण्यात आली आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेदरम्यान गोंधळ होऊ नये, यासाठी २० जूनपर्यंत वाढीव गुणांसह पुरवणी गुणपत्रिका संकेतस्थळावर उपलब्ध करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने बोर्डाला दिले आहेत.
दादरच्या बालमोहन विद्यालयाचा विद्यार्थी हर्षवर्धन राजमाचीकर याने इंडियन आॅलिम्पिक असोसिएशनशी संलग्न असलेल्या आॅल इंडिया फुटबॉल असोसिएशन (एआयएफए) व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने (वायफा) आयोजित असलेल्या नाईकी कप-२०१६ मध्ये भाग घेतला होता.
राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर खेळणाऱ्यांना शालांत परीक्षेमध्ये अतिरिक्त पाच टक्के गुण व स्पोर्ट कोट्यातून प्रवेश द्यावा, असे राज्य सरकारच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. बोर्डाने प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी २० मे ही अंतिम तारीख दिली होती. मात्र हर्षवर्धन याविषयी अनभिज्ञ होता. ३ जूनला शाळेने आॅनलाइन प्रवेशासंबंधी माहिती देण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केल्यावर हर्षवर्धनला ही बाब समजली. मात्र तोपर्यंत कागदपत्रे सादर करण्याची मुदत संपली होती. त्यामुळे हर्षवर्धनने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. एम.एस. संकलेचा व न्या. ए.के. मेनन यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होती.
याचिकाकर्त्याने केवळ नाईकी कप-२०१६ मध्ये सहभाग घेतला असून जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेतला नसल्याने त्याला वाढीव गुण मिळवण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र देऊ शकत नाही, अशी भूमिका वायफाने घेतली. राज्य सरकारने याचिकाकर्त्याच्या दाव्यावर आक्षेप घेतला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने वायफाचा युक्तिवाद ग्राह्य धरण्यास नकार देत हर्षवर्धन याला तातडीने प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)
शाळा, संघटनांना माहिती द्या - बोर्डाला सूचना
हर्षवर्धनप्रमाणे अनेक खेळाडू विद्यार्थी असू शकतात. ज्यांना स्पोर्ट कोट्यासाठी द्याव्या लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती नाही, त्यांना ऐनवेळी प्रमाणपत्रांसाठी धावपळ करावी लागू शकते, अशी भीती खंडपीठाने व्यक्त केली. बोर्डाला सर्व शाळांना व संबंधित संघटनांना खेळाडू विद्यार्थ्यांना शासनाच्या अधिसूचनेची माहिती देण्याचे निर्देश दिले.
तातडीने प्रमाणपत्र द्यावे
संबंधित संघटनांनी स्पोर्ट कोट्याचे लाभ मिळवण्यास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने प्रमाणपत्र द्यावे, तसेच बोर्डाने ते १७ जूनपर्यंत स्वीकारावे, असे आदेश देत उच्च न्यायालयाने २० जूनपर्यंत अशा विद्यार्थ्यांची गुणपत्रिका (वाढीव गुणांसहित) संकेतस्थळावर उपलब्ध करण्याचे निर्देशही बोर्डाला दिले.