जिल्हा परिषदेच्या ‘बोलक्या’ शाळेत ‘कॉन्व्हेंट’चेही विद्यार्थी परतले !
By admin | Published: September 13, 2016 11:16 AM2016-09-13T11:16:32+5:302016-09-13T12:08:37+5:30
सर्वत्रच कॉन्व्हेंट स्कूलचे फॅड असताना, वाशिम तालुक्यातील सोनखास येथील जिल्हा परिषद शाळेने मात्र कॉन्व्हेंटचे विद्यार्थी आपल्याकडे परत आणण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.
Next
>संतोष वानखडे , ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १३ - सर्वत्रच कॉन्व्हेंट स्कूलचे फॅड असताना, वाशिम तालुक्यातील सोनखास येथील जिल्हा परिषद शाळेने मात्र कॉन्व्हेंटचे विद्यार्थी आपल्याकडे परत आणण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. शाळेच्या बोलक्या भिंती, ज्ञानरचनावादावर आधारित अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांमध्ये बसून शिक्षकांची शिकविण्याची कला, मनोरंजनातून शिक्षण आदी अनोख्या उपक्रमामुळे सोनखास जिल्हा परिषदेची शाळा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांपेक्षा खासगी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये दर्जेदार शिक्षण मिळते, अशी मानसिकता पालकांची बनत असल्याने ग्रामीण भागातही कॉन्व्हेंट संस्कृतीचे भरघोष पिक आल्याचे चित्र सर्वत्रच आहे. वाशिम जिल्ह्यातही ग्रामीण भागात कॉन्व्हेंटच्या शाळांनी स्वत:ची पाळेमुळे मजबूत केली आहेत. साधारणत: दोन वर्षांपूर्वी वाशिम तालुक्यातील सोनखास येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतून विद्यार्थ्यांचा प्रवेश काढून कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेण्याला अनेक पालकांनी पसंती दिली होती. यामुळेच शाळेची पटसंख्या २० ते २५ ने घटली. दोन वर्षांपासून या शाळेने झपाट्याने बदल केल्याने यावर्षी कॉन्व्हेंटमधून २५ विद्यार्थी परत जिल्हा परिषद शाळेत आल्याची आशादायी व समाधानाची बाब आहे. सोनखास येथे जिल्हा परिषदेची वर्ग एक ते सातवीपर्यंतची शाळा असून, पाच शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेची पटसंख्या १२२ असून, शाळेच्या भिंतीवर विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी माहिती रंगविण्यात आली आहे. शाळेच्या सर्व भिंती बोलक्या केल्याने साहजिकच विद्यार्थीदेखील ‘बोलके’ होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. वर्गामध्ये ज्ञानरचनावादावर आधारित शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविले जाते. या शाळेत विशेष म्हणजे शिक्षकांनी स्वत:ला बसण्यासाठी खुर्ची न ठेवता विद्यार्थ्यांसोबत सतरंजीवर बसून ते अध्यापनाचे कार्य करतात. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाल्याने विद्यार्थीदेखील या बोलक्या शाळेत रममान होऊन धडे गिरवित आहेत. मुख्याध्यापक जगन्नाथ आरू, शिक्षक नारायण काकडे, विश्वनाथ खानझोडे, संजय सरनाईक, रेखा वाकपांजर या शिक्षकांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आणि गावकºयांच्या सहकार्यातून शाळेच्या भिंती ‘बोलक्या’ बनविण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.