विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षांसाठी करणार प्रश्नावली तयार - राज्य शिक्षण मंडळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 01:26 AM2017-08-24T01:26:05+5:302017-08-24T01:26:20+5:30
अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी आता स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. देशपातळीवर या परीक्षा होतात.
मुंबई : अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी आता स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. देशपातळीवर या परीक्षा होतात. गेल्या दोन ते तीन वर्षांत या परीक्षांमधील गोंधळ वाढत असून, या परीक्षांमध्ये राज्य शिक्षण मंडळाचे विद्यार्थी मागे पडत असल्याचे चित्र काही प्रमाणात दिसून येते. त्यामुळे आता राज्य शिक्षण मंडळ विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रशिक्षण देणार असल्याचे मंडळातर्फे जाहीर करण्यात आले.
उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना एमएचसीईटी, जेईई, नीट परीक्षेच्या अभ्यासात सहाय्य मिळावे, म्हणून आॅनलाइन पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांची तयारी या पोर्टलवर करून घेण्यात येणार आहे. ‘आॅनलाइन प्रीपरेशन पोर्टल’वर या विषयांची प्रश्नपेढी तयार करण्यात येणार आहे. या प्रश्नपेढीसाठी शिक्षण, विषयतज्ज्ञ यांना प्रश्नपेढीत भर टाकण्याचे जाहीर आवाहन केले आहे.
शिक्षकांनी पोर्टलसाठी प्रश्न द्यायचे आहेत, त्यांनी विषयनिहाय प्रश्न तयार करून प्रश्नांच्या तक्त्याची इयत्ता, विषय, घटकाचे नाव, उपघटक उत्तराच्या विश्लेषणासह ३० सप्टेंबरपर्यंत मंडळाच्या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे.
यासाठी शिक्षकांनी http:/neetqb.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर प्रश्न अपलोड करायचे आहेत. शिक्षकांनी प्रश्न पाठविताना विषयांवर फक्त बहुुपर्यायी स्वरूपाचे असावेत. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाºया परीक्षांचा अभ्यासक्रम हा वेगळा असल्याने, या पोर्टलवर देण्यात येणारे प्रश्न परीक्षेत विचारतील असे नाही, पण या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांना सराव होणार आहे, असे मंडळातर्फे सांगण्यात आले.