रविवारी एक्स्ट्रा क्लास घेतला म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत केले असे काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 04:35 PM2020-02-13T16:35:21+5:302020-02-13T16:37:26+5:30
अधिकच्या शिकवणीमुळे रविवारची सुट्टी बुडाल्याने वैतागलेल्या काही मुलांनी शाळेतील शिक्षकांसोबत धक्कादायक कृत्य केल्याची बाब समोर आली आहे.
सिंधुदुर्ग - आपल्या शाळेतील विद्यार्थ्यी चांगले शिकावेत. त्यांना परीक्षेत चांगले गुण मिळावेत, यासाठी अनेक शिक्षक झटत असतात. त्यासाठी प्रसंगी अनेक शाळांमधून सुट्टीच्या दिवशीही अधिकच्या शिकवण्या घेतल्या जातात. मात्र अशा अधिकच्या शिकवणीमुळे रविवारची सुट्टी बुडाल्याने वैतागलेल्या काही मुलांनी शाळेतील शिक्षकांसोबत धक्कादायक कृत्य केल्याची बाब समोर आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरालगत असलेल्या एका गावातील शाळेमध्ये हा प्रकार घडला आहे. दहावीची परीक्षा जवळ आल्याने उजळीसाठी शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा अतिरिक्त वर्ग रविवारी भरवण्यात आला होता. मात्र या अतिरिक्त वर्गामुळे रविवारची सुट्टी बुडाल्याने काही मुले नाराज होती. त्यापैकी पाच मुलांनी शिक्षकांना धडा शिकवण्यासाठी वर्गातील शिक्षकांच्या बसण्याच्या जागेवर तसेच टेबलावर खाजकुलीची पुड टाकून ठेवली. त्यामुळे वर्गात शिकवण्यास आलेल्या दोन शिक्षिकांना ही पुड लागून त्यांना त्रास झाला.
ग्रामीण भागात सर्रासपणे आढळणाऱ्या खाजकुलीच्या वेलीला येणारी फळे आणि त्या फळांची पुड शरीरास लागल्यास तीव्र खाज येऊन, जळजळ होते. ही बाब माहिती असलेल्या या मुलांनी या खाजकुलीच्या पुडीचा प्रयोग आपल्या शिक्षकांना धडा शिकवण्यासाठी केला.
दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शाळेच्या प्रशासनाने संबंधित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना बोलावून घेत त्यांची कानउघाडणी केली. मात्र मुलांचे दहावीचे महत्त्वाचे वर्ष आणि परीक्षा समोर असल्याने या मुलांना केवळ समज देऊन सोडून देण्यात आले.