इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना मनस्ताप
By admin | Published: May 7, 2014 10:26 PM2014-05-07T22:26:35+5:302014-05-07T22:26:35+5:30
पुणे विद्यापीठाने इंजिनिअरिंग द्वितीय वर्षाच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत केलेल्या चुकीमुळे वाघोलीतील मोझे विद्यालयाच्या ४० ते ४५ विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
वाघोली : पुणे विद्यापीठाने इंजिनिअरिंग द्वितीय वर्षाच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत केलेल्या चुकीमुळे वाघोलीतील मोझे विद्यालयाच्या ४० ते ४५ विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. प्रश्नपत्रिकेत १७ गुणांचे चुकीचे प्रश्न आले असताना इतर महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका बदलून दिल्या असल्या, तरी मोझे महाविद्यालयाकडून सुधारित प्रश्नपत्रिका बदलून दिल्या नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. चुकीची प्रश्नपत्रिकाच विद्यार्थ्यांनी सोडविली असल्याने त्यांना वर्ष वाया जाण्याची चिंता सतावू लागली आहे. मंगळवारी द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगचा गणित विषयाचा पेपर पुणे विद्यापीठाकडून वाघोलीतील मोझे महाविद्यालयामध्ये घेण्यात आला. पेपर सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका हाताळली असता १७ गुणांचे प्रश्न क्रमांक ७ व ८ हे अभ्यासक्रमाच्या बाहेरील असल्याचे समजले. ही बाब विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या लक्षात आणून दिली; मात्र विद्यालयाच्या शिक्षकांकडून याबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. विद्यार्थ्यांनी पेपर तसाच सोडविला. पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी इतर महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. इतर महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना अर्ध्या तासामध्ये सुधारित प्रश्नपत्रिका बदलून दिल्या असल्याचे त्यांना समजले. विद्यार्थ्यांनी प्राचार्य व परीक्षा नियंत्रकाशी संपर्क साधून प्रश्नपत्रिकेतील चूक निदर्शनास आणून दिली व तसे लेखी निवेदनही दिले. इतर महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका बदलून मिळत असेल आणि मोझे विद्यालयातच प्रश्नपत्रिका बदलून मिळत नसेल, तर महाविद्यालयाने गलथान कारभार केला असेल, असा आरोपही विद्यार्थ्यांनी केला. मात्र, विद्यापीठाच्या चुकीमुळे ४० ते ४५ विद्यार्थ्यांनी चुकीची प्रश्नपत्रिका सोडविली आहे. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांनी १७ गुणांच्या चुकीच्या प्रश्नांची बाब महाविद्यालयाच्या लक्षात आणून दिल्यानंतर महाविद्यालयाच्या वतीने विद्यापीठाशी तत्काळ संपर्क साधण्यात आला आणि प्रश्नपत्रिकेतील चुकांच्या बाबतीतही लेखी कळविण्यात आले. या बाबतीत विद्यापीठ योग्य तोडगा काढेल, अशी अपेक्षा आहे. विद्यापीठाकडून प्रश्नपत्रिका बदलून देण्याबाबत कोणताही संदेश, ई-मेल आला नसल्याने आम्ही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका बदलून दिल्या नाहीत. - ए. एस. गोजे, प्राचार्य, मोझे महाविद्यालय, वाघोली