पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 03:43 AM2019-11-06T03:43:12+5:302019-11-06T03:43:35+5:30
दुष्काळग्रस्तांसाठी विद्यापीठाचे पाऊल
मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या ओला दुष्काळ आणि कोल्हापूर, साताऱ्यामध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना शुल्क भरणे शक्य नाही. ही बाब लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठात शिक्षण घेणाºया राज्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे, तसेच अन्य विद्यापीठानेही असा निर्णय घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केला.
राज्यातील कोल्हापूर, सातारा व सांगली या जिल्ह्यांत आलेला पूर आणि त्यापाठोपाठ परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या मुलांना दोन वेळचे जेवण मिळणे अवघड झाले आहे, तर ते शैक्षणिक व परीक्षा शुल्क कसे भरणार, असा प्रश्न युवासेनेच्या सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी हरकतीच्या मुद्द्यांद्वारे सिनेट बैठकीत उपस्थित केला.
युवासेनची मागणी मान्य करत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी मुंबई विद्यापीठात शिक्षण घेणाºया पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला, तसेच या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे.
विद्यापीठात शिकत असलेल्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची माहिती घेण्यात येणार आहे. त्यानंतर, विद्यार्थ्यांना अर्ज करता यावा, यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात येऊन त्याची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
- डॉ. सुहास पेडणेकर,
कुलगुरू, मुंबई विद्यापीठ.