‘कटआॅफ’मुळे विद्यार्थ्यांची फसगत
By admin | Published: June 28, 2016 12:41 AM2016-06-28T00:41:32+5:302016-06-28T00:41:32+5:30
खासगी कोचिंग क्लासेसशी असलेल्या छुप्या करारामुळे अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थी सोयी-सुविधा, शिक्षक नसलेल्या कॉलेजमध्येही प्रवेश घेतात.
पुणे : खासगी कोचिंग क्लासेसशी असलेल्या छुप्या करारामुळे अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थी सोयी-सुविधा, शिक्षक नसलेल्या कॉलेजमध्येही प्रवेश घेतात. त्यामुळे या कॉलेजचा कटआॅफ आपोआप वाढत आहे. परिणामी पुढील वर्षी हाच कटआॅफ पाहून अनेक विद्यार्थी या कॉलेजला पसंती देतात. यंदाही अशाच काही कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्याने त्यांची फसगत झाली आहे. प्रत्यक्ष कॉलेजमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर खरी परिस्थिती येत आहे. मागील वर्षी अशाप्रकारच्या अनेक तक्रारी विद्यार्थ्यांकडून होऊनही केंद्रीय प्रवेश समितीने यंदा त्याबाबत कोणतेही पाऊल उचललेले नाही.
केंद्रीय प्रवेश समितीने सोमवारी अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली. त्यानुसार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी सुरुवात केली. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून पुणे व पिंपरी-चिंचवडमधील २१८ कॉलेजमधील ५० कॉलेजेसचे पसंतीक्रम भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. पसंतीक्रम भरत असताना विद्यार्थी केवळ संबंंधित कॉलेजचा मागील वर्षीचे कटआॅफ गुण पाहतात. त्यानुसार आपल्याला मिळालेल्या गुणांशी तुलना करून पसंतीक्रम देतात. केंद्रीय प्रवेश समितीकडून दिलेल्या माहिती पुस्तकातही केवळ संबंधित कॉलेजचे मागील वर्षीचे कटआॅफ, शुल्क व इतर माहिती देण्यात आली आहे. मात्र, त्यामध्ये कॉलेजमध्ये असलेल्या सुविधा, शिक्षक, ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडांगण तसेच इतर माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरुवातीला याबाबत माहितीच होत नाही.
अनेक विद्यार्थी साधारणपणे कटआॅफ व नामांकित कॉलेजला अधिक पसंती देतात. त्यानुसार पसंती क्रम भरले जातात. मात्र, इथेच विद्यार्थ्यांची फसगत होत आहे. शहरातील काही महाविद्यालयांनी खासगी कोचिंग क्लासेसशी छुपा करार केलेला आहे. या करारानुसार क्लासेसमधील विद्यार्थ्यांना संबंंधित महाविद्यालयात ७५ टक्के हजेरी तसेच प्रात्यक्षिकांमधून सवलत मिळते. त्यामुळे अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थी या कॉलेजला पसंती देतात. तसेच काही कॉलेज विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी आधीपासूनच हजरीतून सवलत, प्रात्यक्षिकांमध्ये वाढीव गुण देण्याचे अमिष दाखवतात. त्यामुळे चांगले गुण मिळालेले विद्यार्थी या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यास उत्सुक असतात. शिक्षकांची अपुरी संख्या तसेच इतर आवश्यक सुविधा नसलेल्या कॉलेजचे कटआॅफही इतर नामांकित कॉलेजच्या कटआॅफच्या जवळपास असते. यावर्षीच्या गुणवत्ता यादीतही ही स्थिती दिसून आली आहे.