हुश्श !गाडीने पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश केला, ४१ तासांच्या 'लॉकडाऊन' नंतर विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 03:52 PM2020-05-18T15:52:10+5:302020-05-18T16:28:25+5:30
स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी दिल्लीत राहिलेल्या सुमारे १३०० हून अधिक विद्यार्थ्यांना आणण्यासाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्यात आली होती.
पुणे : दिल्लीत शनिवारी सकाळी १० वाजता सुरू झालेली तपासणी सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालली. तिथून दोन तास बसने प्रवास करून रेल्वे स्थानकात... सुरक्षित अंतराकडे रेल्वेसह प्रशासनाकचेही दुर्लक्ष... पाच जनरल डब्यात प्रत्येकी ७० हून अधिक विद्यार्थी कोंबलेले... व्यवस्थित बसणेही कठीण...जेवणाची व्यवस्थाही नाही... सकाळपर्यंत रेल्वे डब्यातील पाणीही संपले...गाडी रविवारी दुपारी भुसावळमध्ये आल्यानंतर मदतीचा हात पुढे आले... तब्बल ४१ तासांच्या लॉकडाऊन नंतर पहाटे ३.३० वाजता गाडी पुणे स्थानकात पोहचल्याने सुटकेचा नि:श्वास टाकल्याचे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी दिल्लीत राहिलेल्या सुमारे १३०० हून अधिक विद्यार्थ्यांना आणण्यासाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्यात आली होती. पण गाडीने आलेल्या विद्यार्थ्यांना दिल्लीसह रेल्वेगाडीतही त्रास सहन करावा लागला. ही गाडी शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता दिल्ली स्थानकातून रवाना झाली होती. भुसावळ, नाशिक, कल्याण या स्थानकांनंतर ही गाडी अखेरच्या पुणे स्थानकावर सोमवारी पहाटे ३.३० वाजता पोहचली. पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापुर, लातुर, उस्मानाबाद, सोलापुर या जिल्ह्यांतील सुमारे ४०० हून अधिक विद्यार्थी स्थानकात उतरले. विद्यार्थ्यांची तपासणी करून विशेष बसने मुळ गावी पाठविण्यात आले. त्यांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले असून ३१ मे पर्यंत घराबाहेर न पडण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांचा शुक्रवारी सकाळी १० वाजता दिल्लीत सुरू झालेला प्रवास ४१ तासांनी पुण्यात संपला. तरीही अन्य जिल्ह्यांमध्ये गेलेले विद्यार्थी दुपारपर्यंत प्रवासातच होते. त्यांचा लॉकडाऊन ५० तासांहून अधिक होता. काही विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत शनिवारी सकाळी १० वाजता या विद्यार्थ्यांची ठिकठिकाणी तपासणी सुरू झाली. ही तपासणी सायंकाळपर्यंत सुरू राहिली. यादरम्यान विद्यार्थ्यांना ना पाणी, ना जेवण मिळाले. त्यांनी आपल्यापरीने जवळच्या दुकानांमध्ये मिळेल ते खाल्ले. पण हा त्रास इथेच संपला नाही. रात्रीचे जेवण रेल्वेकडून दिले जाणार होते. पण स्थानकात पोहचल्यानंतर तिथेही उपवास घडणार असल्याचे स्पष्ट झाले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या फुड पॅकेटमधील स्नॅक्समुळे काहीसा दिलासा मिळाला. सुरक्षित अंतराचा नियम पाळण्यात आला नाही. स्लीपर कोचमध्ये पुरेशी जागा असतानाही पाच जनरल डब्यांमध्ये प्रत्येकी ७० हून अधिक विद्यार्थी बसविण्यात आले. तिथे सामानासह नीट बसणेही कठीण होते. त्यामुळे काही जणांनी रात्र जागून काढली. तर काहींना खाली झोपावे लागले. गाडीतील पाणीही संपल्याने पुन्हा हाल झाले. अखेर भुसावळमध्ये आल्यानंतर पुढचा प्रवास सुखकर झाला, असे राजेश बोनवटे यांनी सांगितले.
-------------------