वसतिगृहातील विद्यार्थ्यांची दिवाळी कुलगुरूंसमवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2016 01:07 AM2016-10-31T01:07:02+5:302016-10-31T01:07:02+5:30
आर्थिक परिस्थितीमुळे गावी न जाऊ शकलेल्या विद्यार्थ्यांबरोबर कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी दिवाळी साजरी केली.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या आणि परीक्षेची तयारी आणि आर्थिक परिस्थितीमुळे गावी न जाऊ शकलेल्या विद्यार्थ्यांबरोबर कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी दिवाळी साजरी केली. फराळाचे वाटप करून गाडे यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी शैक्षणिक, वसतिगृहातील समस्या जाणून घेतल्या.
विद्यापीठात राज्यातील, राज्याबाहेरील तसेच परदेशातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आले असून, वसतिगृहात राहत आहेत. बहुतांश सर्व विद्यार्थी आपल्या कुटुंबीयांबरोबर दिवाळी सण साजरा करतात. मात्र, विद्यापीठातील विविध विभागांत शिक्षण घेणारे सुमारे २00 विद्यार्थी आर्थिक परिस्थिती व परीक्षांची तयारी करण्यासाठी दिवाळीतही वसतिगृहातच थांबले आहेत. त्यामुळे डॉ. वासुदेव गाडे यांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या मागील हिरवळीवर या विद्यार्थ्यांबरोबर दिवाळी साजरी केली.
या प्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, वसतिगृह प्रमुख डी.डी. निकम, प्रा.सदानंद भोसले, नवनाथ तुपे, उपकुलसचिव के.बी. खिलारे आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)