आयटीआय संपामध्ये विद्यार्थ्यांचीही उडी
By Admin | Published: January 14, 2016 02:25 AM2016-01-14T02:25:05+5:302016-01-14T02:25:05+5:30
राज्यातील अशासकीय आयटीआयमधील प्राचार्य आणि कर्मचारी संघटनेने वेतन अनुदानासाठी पुकारलेल्या संपाला आयटीआय विद्यार्थी संघटनेनेही पाठिंबा दिला आहे.
मुंबई : राज्यातील अशासकीय आयटीआयमधील प्राचार्य आणि कर्मचारी संघटनेने वेतन अनुदानासाठी पुकारलेल्या संपाला आयटीआय विद्यार्थी संघटनेनेही पाठिंबा दिला आहे. मंगळवारी निफाडमध्ये मोर्चा काढल्यानंतर राज्यभर मोर्चे काढून विद्यार्थी संघटना शिक्षकांच्या मागणीला पाठिंबा देणार आहेत.
आयटीआय विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष निखिल मोरे यांनी सांगितले की, अशासकीय आयटीआयला वेतन अनुदान मिळाले तर विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कात कपात होईल. त्यामुळे वेतन अनुदानाचा अप्रत्यक्ष फायदा विद्यार्थ्यांनाही होणार आहे. वेतन अनुदानाअभावी बरेच अशासकीय आयटीआय बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शासकीय आयटीआयमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची ससेहोलपट होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यामुळे शिक्षक, प्राचार्य व कर्मचाऱ्यांना मोठे पाठबळ मिळाल्याची प्रतिक्रिया अशासकीय आयटीआय प्राचार्य, कर्मचारी संघटनेने दिली.
मात्र प्रशासनाकडून आंदोलन चिरडण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले की, जिल्हास्तरावर मोर्चे काढण्यासाठी पोलीस आणि विद्यापीठ प्रशासन परवानगी देत नाही आहेत. तर आझाद मैदानात बेमुदत उपोषण आणि धरणे आंदोलन करणाऱ्या प्राचार्य आणि शिक्षकांना रविवारी आझाद मैदानात उपोषणास बसता येणार नाही, असे पोलिसांनी बजावले आहे. मात्र कितीही दबाव टाकला, तरी आंदोलन मागे घेणार नसल्याचा निश्चय संघटनेने केल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
जळगाव-नाशिकमध्ये पाठिंबा
गरीब विद्यार्थ्यांना चांगले प्रशिक्षण देण्यासाठी अशासकीय आयटीआय मजबूत होण्याची गरज आहे. त्यासाठी विद्यार्थी शनिवारी जळगाव आणि बुधवारी नाशिकमध्ये मोर्चा काढून संघटना शिक्षकांना पाठिंबा देणार आहे.