विद्यार्थ्यांनी घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
By admin | Published: June 9, 2016 01:19 AM2016-06-09T01:19:35+5:302016-06-09T01:19:35+5:30
राज्यातील विविध विद्यापीठातून आलेल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) जवानांकडून आपत्ती व्यवस्थापनाचे धडे गिरविले
पुणे : महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत राबविल्या जाणा-या ‘आव्हान’ या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित आपत्ती व्यवस्थापन शिबिरामध्ये राज्यातील विविध विद्यापीठातून आलेल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) जवानांकडून आपत्ती व्यवस्थापनाचे धडे गिरविले. देहूगाव येथील नदीच्या पात्रात बुडणाऱ्या व्यक्तीला कसे वाचवावे याचे प्रशिक्षण घेतले. तसेच विद्यापीठाच्या आवारात बॉम्बस्फोट किंवा आग लागल्यामुळे इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांना कसे वाचवावे याबाबतचे प्रशिक्षण घेतले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ‘आव्हान’ मध्ये राज्यातील ३६ जिल्ह्यांमधून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून निवडलेले १ हजार १२२ महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्यात ७३१ विद्यार्थी व ३६४ विद्यार्थीनी आणि ६४ कार्यक्रम अधिकारी यांचा समावेश आहे. मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी घ्यावयाची काळजी, त्यासाठी करावयाच्या इतर उपाययोजना याबाबत प्रशासकीय, वैद्यकीय मदत, तत्सम कार्यप्रणाली संदर्भात मार्गदर्शन व प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे सहा गट तयार करण्यात आले आहेत.
देहूगाव येथील नदी पात्राजवळ विद्यार्थ्यांना बोटी तयार करणे, तराफा तयार करणे, पोहता येत असताना वाचविणे किंवा न येत असताना बुडणा-याला कसे वाचवावे याचे प्रशिक्षण दिले.तसेच लाइफ जॅकेट तयार करण्याचे, थर्माकोलपासून लाइफ जॅकेट बनविण्याचे, पाण्यावर कसे तरंगता येईल याबाबतची माहिती दिली. (प्रतिनिधी)
>चित्तथरारक प्रशिक्षण
विद्यापीठाच्या आठ क्रमांच्या वसतीगृहाच्या इमारतीजवळ एनडीआरएफचे जवान सुनील तिवारी, बी.के.सिंग यांनी विद्यार्थ्यांना भिंतीवरून चढण्याचे व उतरण्याचे तसेच इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांना वाचविण्याचे प्रशिक्षण दिले.एखाद्या सिनेमात पहावी अशी चित्तथरारक दृश्ये पाहून विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या प्रसंगी विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ.संजयकुमार दळवी उपस्थित होते.