विद्यार्थ्यांनी जाणून घेतली जर्मन संस्कृती
By Admin | Published: May 18, 2016 02:08 AM2016-05-18T02:08:54+5:302016-05-18T02:08:54+5:30
येथील २२ विद्यार्थ्यांनी जर्मनी या देशाचा अभ्यासदौरा यशस्वीरीत्या पूर्ण केला. याद्वारे विद्यार्थ्यांनी जर्मन संस्कृती जवळून जाणून घेतली.
तळेगाव दाभाडे : येथील २२ विद्यार्थ्यांनी जर्मनी या देशाचा अभ्यासदौरा यशस्वीरीत्या पूर्ण केला. याद्वारे विद्यार्थ्यांनी जर्मन संस्कृती जवळून जाणून घेतली.
येथील फार्शश्पिलॅन अकादमीच्या संचालिका रुचा वळवडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी जर्मन दौऱ्यासाठी गेले होते. तळेगावसारख्या ठिकाणी राहून त्या गेली १६ वर्षे जर्मन भाषा शिकवत आहेत. परदेशी भाषा शिकवणाऱ्यांना त्या देशात जाऊन तिथली संस्कृती जाणून घ्यावी, असे नक्कीच वाटते. म्हणूनच या दौऱ्याचे नियोजन केले होते. जर्मनी, स्वित्झर्लंड, आॅस्ट्रिया व फ्रान्स या चार देशांमध्ये हा अभ्यासदौरा झाला.
तेथील संस्कृतीची मुलांना ओळख व्हावी, तसेच आपल्या भारताचे नागरिकत्व या संकुचित दृष्टिकोनातून जागतिक नागरिकत्व या विचाराकडे मुलांची वाटचाल व्हावी हा मुख्य उद्देश होता. जर्मनीमध्ये चर्च, तिथली विद्यापीठे, शाळा, संसदभवन, टेलिव्हिजन टॉवर येथे ही मुले गेली होती. म्युनशेन शहरातले लेक कॉन्स्टान्स रिजन हे प्रचंड मोठे तळे पाहायला मिळाले. मुलांना तेथील कुटुंबांमध्ये राहण्याची संधीदेखील मिळाली. युरोपीय देशांतदेखील एकत्र कुटुंबपद्धती आहे, हे यामुळे मुलांना अनुभवता आले.
प्रा. शिरीष अवधानी, गणेश बिडकर, रोहिणी दामले, श्रीनिवास पेंडसे, डॉ. सविता केळकर यांनी मार्गदर्शन केले. श्रीधर वळवडे यांचे सहकार्य लाभले.
वळवडे यांनी सांगितले, ‘‘या दौऱ्यात एकुलत्या मुलांची संख्या जास्त होती. या दौऱ्यामुळे त्यांना शेअरिंग करण्याची चांगली सवय लागली आहे. हा अभ्यास दौरा जर्मन भाषा शिकणाऱ्यांसाठी व न शिकणाऱ्यांसाठी अनोखा अभ्यासक्रमच होता.
सार्वजनिक स्वच्छता हे मूल्य या दौऱ्यात त्यांच्या अंगी रुजले आहे. नियोजन करून वेळेत काम पूर्ण करणे, आपली ध्येये उंचावणे या सगळ्या गोष्टी मुले शिकली. या दौऱ्यानंतर दर वर्षी अशा अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्याची इच्छा आहे. तसेच एक्स्चेंज प्रोग्रॅममध्ये तिथली मुले तळेगावमधल्या कुटुंबात येऊन राहतील, असा प्रयत्नदेखील करणार आहे.’’ (वार्ताहर)