विद्यार्थिनी शिकतेय स्वत:चीच कविता

By admin | Published: April 25, 2016 04:59 AM2016-04-25T04:59:57+5:302016-04-25T04:59:57+5:30

‘झाड देते माया, झाड देते छाया...’ ही कविता इयत्ता सहावीच्या नव्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे.

Students learn self-poems | विद्यार्थिनी शिकतेय स्वत:चीच कविता

विद्यार्थिनी शिकतेय स्वत:चीच कविता

Next

अविनाश साबापुरे,

यवतमाळ- ‘झाड देते माया, झाड देते छाया...’ ही कविता इयत्ता सहावीच्या नव्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, याची कवयित्रीदेखील इयत्ता सहावीतीलच असून, यवतमाळनजीकच्या कापरा मेथड गावातील आहे. सोनाली श्रावण फुपरे असे या कवयित्रीचे नाव आहे.
नव्या शैक्षणिक सत्रासाठी इयत्ता सहावीचा नवा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यात यवतमाळपासून १८ किलोमीटर अंतरावरील कापरा मेथड या डोंगर आणि जंगलव्याप्त गावातील सोनालीची कविता समाविष्ट करण्यात आली आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने सहावीसाठी मराठीचे पाठ्यपुस्तक तयार करताना, या पुस्तकात सहाव्या वर्गातीलच एका विद्यार्थ्याची कविता घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी राज्यभरातील शाळांना आवाहन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कविता मागविण्यात आल्या होत्या. राज्यभरातून हजारो विद्यार्थ्यांच्या कविता शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आल्या. केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या सोनाली फुपरे या एकमेव विद्यार्थिनीची कविता निवडण्यात आली, अशी माहिती भाषाविषयक अभ्यासक्रम समितीचे सदस्य समाधान शिकेतोड, विजय राठोड यांनी दिली.
>चला, कविता करू या !
मराठीच्या नव्या पुस्तकात ‘चला, कविता करू या’ हा पाठ्यक्रम आहे. त्यात सोनालीची ‘झाड’ ही कविता देण्यात आली आहे. त्याखाली ‘सोनालीप्रमाणेच आपणही कविता लिहू या’ अशी सूचनाही विद्यार्थ्यांसाठी छापण्यात आली आहे. त्यामुळे सोनालीची कविता अखिल महाराष्ट्रातील सहाव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरली आहे. सोनाली पाचव्या वर्गापासूनच कविता लिहिते. तिचे वडील श्रावण आणि आई वनिता हे शेती करतात.
>झाड देते माया, झाड देते छाया...
झाड आहे हिरवेगार
वारा देते थंडगार
झाडाच्या सावलीत मी बसते
झाड खुदकन् गालात हसते
झाड देते माया
झाड देते छाया
झाडावर भरते पक्ष्यांची शाळा
झाडाखाली सर्व प्राणी होतात गोळा
झाडाला लागतात सुंदर फुले
फुले तोडायला येतात मुले
झाड आहे माझा मित्र
माझ्या मनात राहते
नेहमी झाडाचे चित्र
- सोनाली श्रावण फुपरे
(इयत्ता : सहावी)

Web Title: Students learn self-poems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.