विद्यार्थी मुकले नेट परीक्षेला
By admin | Published: January 22, 2017 02:10 PM2017-01-22T14:10:55+5:302017-01-22T14:10:55+5:30
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नेट परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशनकडे (सीबीएसई) देण्यात आली आहे.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 22 - विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नेट परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशनकडे (सीबीएसई) देण्यात आली आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून सीबीएसईच्या अधिका-यांकडून परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडे असंवेदशीलतेने पाहिले जाते. परिणामी राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यापासून मुकावे लागत आहे. रविवारी शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर 1 ते 2 मिनिट उशिराने पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
सीबीएसईतर्फे रविवारी (दि.22) शहातील विविध परीक्षा केंद्रांवर नेट परीक्षा घेतली जाणार होती. राज्यातील विविध भागातून विद्यार्थी पुण्यात परीक्षा देण्यासाठी आले होते. त्यातील काही विद्यार्थी सकाळी 9 वाजल्यापासूनच परीक्षा केंद्रावर पोहोचत होते. पहिला पेपर 9.30 वाजता सुरू होणार होता. सर्व विद्यार्थ्यांनी त्यापूर्वी परीक्षा केंद्रावर हजर राहणे आवश्यक होते. परंतु जळगाव, लातूर, सातारा या जिल्ह्यांसह पुणे शहरातील व ग्रामीण भागातून येणा-या काही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास 1 ते 2 तास तर काहींना 5 ते 10 मिनिटे उशीर झाला. त्यामुळे शिवाजीनगर येथील पॉलिटेक्निक कॉलेज येथील परीक्षा केंद्रांच्या प्रमुखांनी काही विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू दिले नाही. तसेच बाणेरच्या आॅर्चिड इंटरनॅशनल स्कूल येथील परीक्षा केंद्रावर जळगाव येथील जितेंद्र पाटील या अंध विद्यार्थ्याला 2 मिनिटांसाठी परीक्षा केंद्राबाहेर उभे केले.
सतीश येलकर म्हणाले, पॉलिटेक्निक कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर मी वेळेत पोहोचले होतो. प्रवेशद्वारातून आत जाऊन मी परीक्षा हॉलमध्ये गेलो.परंतु सुपरव्हायजरने मला परीक्षेस बसू दिले नाही. त्यामुळे मी परीक्षा केंद्राच्या प्रमुखांना भेटण्यासाठी गेलो. ते नाष्टा होते. त्यात 5 ते 10 मिनिटे गेली. त्यानंतर परीक्षा केंद्र प्रमुखांनीही उशीर झाल्याचे सांगत बाहेर जाण्यास सांगितले. तसेच परीक्षेच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार देणार असल्याची धमकी दिली. परीक्षा केंद्राबाहेर चार विद्यार्थी उभे होते. माझ्यासह प्रवीण गायकवाड, कोमल कोळी, अमरदीप गुरमे या विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच घरी परतावे लागले.
-------------------------------
जितेंद्र पाटील या अंध विद्यार्थ्याने सांगितले, मी बाणेर परिसरातील आॅर्चिड इंटरनॅशनल स्कूल येथील परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ वेळेत पोहोचलो होतो. परीक्षा केंद्रात एका पेक्षा अधिक प्रवेशद्वार होते. मी ज्या प्रवेशद्वारातून आत चाललो तेथे मला थांबवले आणि दुस-या प्रवेशद्वारातून जाण्यास सांगितले. त्यामुळे मला 2 मिनिटे उशीर झाला. त्यानंतर मला परीक्षेस बसू दिले नाही.