सहावीच्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्याची कविता!
By Admin | Published: February 19, 2016 03:47 AM2016-02-19T03:47:27+5:302016-02-19T03:47:27+5:30
एरवी इतरांचे धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्यांना, आता त्यांच्यापैकीच कोणीतरी लिहिलेली कथा, कविता पाठ्यपुस्तकातून अभ्यासण्याची विलक्षण अनुभूती मिळणार असून
यदु जोशी , मुंबई
एरवी इतरांचे धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्यांना, आता त्यांच्यापैकीच कोणीतरी लिहिलेली कथा, कविता पाठ्यपुस्तकातून अभ्यासण्याची विलक्षण अनुभूती मिळणार असून, या अनोखी प्रयोगाची सुरुवात महाराष्ट्रातून होत आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण आणि संशोधन परिषदेने राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना यासंबंधी पत्र लिहून विद्यार्थ्यांच्या निवडक कथा, कविता मागविल्या आहेत. विशेष म्हणजे निवड झालेली कथा, कविता ही त्या विद्यार्थ्याच्या हस्ताक्षरातच पुस्तकात छापली जाणार आहे. विद्यार्थ्यांना लेखक म्हणून पाठ्यपुस्तकात स्थान देऊन त्यांच्या प्रज्ञा-प्रतिभेला नवं आकाश निर्माण करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न असेल. पुढच्या वर्षी सहावीत जाणार असलेल्या विद्यार्थ्यांच्या लिखाणाची निवड त्यासाठी केली जाणार आहे. हे लिखाण शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून येत्या आठ दिवसांत ्िर१.े२ूी१३@ॅें्र’.ूङ्मे या मेलवर शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आले आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांनी जाणकार शिक्षकाकडून आपल्या जिल्ह्यातील सर्वोत्तम कविता, कथेची निवड करून ती पाठवायची आहे. आशयाला अनुरूप त्याच विद्यार्थ्याने काढलेले चित्र असेल तर उत्तम, कवितेचा विषय विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी निगडित असावा, असे राज्य शिक्षण आणि संशोधन परिषदेने स्पष्ट केले आहे.
परिषदेच्या सूत्रांनी सांगितले की, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या कथा, कविता या पाठ्यक्रम तयार करणाऱ्या अभ्यास मंडळासमोर ठेवण्यात येतील आणि अभ्यास मंडळ अंतिम निर्णय घेईल. विद्यार्थी जीवनातच मुलांना लेखक होण्याची ही सुवर्णसंधी असेल आणि इतर विद्यार्थ्यांना त्यापासून लिखाणाची प्रेरणा मिळेल हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
आपल्याच पाठ्यपुस्तकात आपली कथा, कविता अभ्यासण्याचा पहिला मान कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता असेल. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला तर पुढील वर्षीपासून अन्य इयत्तांसाठीही असाच उपक्रम राबविण्याचा परिषदेचा विचार आहे.