Students Protest: 'आंदोलनात चुकीची माणसे घुसली, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही'- बच्चू कडू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 04:33 PM2022-01-31T16:33:56+5:302022-01-31T16:34:42+5:30
आज राज्यात अनेत ठिकाणी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.
मुंबई: दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईनऐवजी ऑनलाईन घ्याव्यात, या मागणीसाठी हजारो विद्यार्थी राज्यभरात आज रस्त्यावर उतरले. मुंबई, नागपूर, उस्मानाबाद, औरंगाबाद आणि अकोलासह विविध शहरांत विद्यार्थ्यांसह काही कार्यकर्त्यांनी ऑफलाईन परीक्षेला तीव्र विरोध केला. दरम्यान, राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
'विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ'
एबीपी माझाशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, काही विद्यार्थी रस्त्यावर आले म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचे हेच मत आहे, असे नाही. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात काही चूकीचे लोकही असतील असे माझे मत आहे. याची आता चौकशी केली जाईल आणि आंदोलनातील मागण्यांवर चर्चाही करुन विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन हे ठरवण्यासाठी कोणालाही सल्ला द्यायची गरज नाही. हे निर्णय शिक्षण विभाग घेईल, असंही ते म्हणाले.
'विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही'
ते पुढ म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या आंदोलनात शिक्षणाशी काहीही संबंध नसणारी काही चूकीची माणसं घुसली आहेत. या सर्वाच्या मागे कोण आहे याचा शोध घेऊ आणि आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांची योग्य चौकशी करू, त्यांच्या शालेय जीवनावर कोणताही दुष्पपरिणाम होऊ देणार नाही. तशा सूचना पोलिसांना देऊ, असं बच्चू कडू म्हणाले.
अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे आंदोलन
आज अचानक राज्यात अनेत ठिकाणी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले. नागपूर, औरंगाबाद, मुंबई आणि उस्मानाबादमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मुंबईत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोरही हजारो विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी आल्याने पोलिसांचाही काहीकाळ गोंधळ उडाला. दरम्यान, विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.