शासनाकडून ‘स्कॉलर’ विद्यार्थ्यांची थट्टा, शष्यवृत्तीपोटी मिळतात महिन्याला अवघे १०० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 02:36 AM2018-02-12T02:36:59+5:302018-02-12T02:37:13+5:30
प्राथमिक व माध्यमिकमधील गुणवंत (स्कॉलर) विद्यार्थ्यांना शासनाकडून महिना १०० रुपयांची तुटपुंजी शिष्यवृत्ती देऊन थट्टा केली जात आहे. या शिष्यवृत्तींमध्ये अनेक वर्षांपासून वाढच करण्यात आली नसल्याने या परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परीक्षार्थींची संख्या १५ लाखांवरून ८ लाखांपर्यंत घसरली आहे.
दीपक जाधव
पुणे : प्राथमिक व माध्यमिकमधील गुणवंत (स्कॉलर) विद्यार्थ्यांना शासनाकडून महिना १०० रुपयांची तुटपुंजी शिष्यवृत्ती देऊन थट्टा केली जात आहे. या शिष्यवृत्तींमध्ये अनेक वर्षांपासून वाढच करण्यात आली नसल्याने या परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परीक्षार्थींची संख्या १५ लाखांवरून ८ लाखांपर्यंत घसरली आहे.
महाराष्टÑ शासनाने गुणवंत विद्यार्थ्यांना गरीब परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी १९५४ पासून ४वी व ७वी मध्ये स्कॉलरशिप परीक्षा घेऊन दरमहा शिष्यवृत्ती देण्यास सुरुवात केली. महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेकडून ही परीक्षा घेतली जाते. दोन वर्षांपूर्वी या परीक्षांच्या इयत्तेमध्ये बदल करण्यात आला असून आता ५वी (पूर्व उच्च प्राथमिक) व ८वी (पूर्व माध्यमिक)च्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी होत आहे. यंदा ५ वी व ८ वी या दोन्ही इयत्तांसाठी मिळून केवळ ७ लाख ८९ हजार ८१२ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. २००९मध्ये ही संख्या २१ लाख होती.
शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत येणाºया ५वीच्या १६ हजार, तर ८वीच्या १३हजार विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये अनेक वर्षांपासून वाढच करण्यात आलेली नाही. महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करूनही अनेक दिवस उलटले, तरी यावर निर्णय घेण्यात आलेला नाही.
यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सुर आहे़ परिक्षार्थींची संख्या अजून कमी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे़