‘विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे’
By Admin | Published: January 7, 2017 03:13 AM2017-01-07T03:13:33+5:302017-01-07T03:13:33+5:30
विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे तरच त्यांची प्रगती होईल.
कासा (ता. डहाणू) : विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे तरच त्यांची प्रगती होईल. शिक्षणाची प्रबळ इच्छा असेल तर कोणतीही परिस्थिती आडवी येत नाही त्यावर मात करता येते असे मत आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी व्यक्त केले. ते उधवा येथे ४२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
जिल्हा परिषद शाळा उधवा लिटल चॅम्प इंग्लीश मिडीअम स्कूल, शिक्षण विभाग पं. स. तलासरी व विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उधवा येथील जिल्हा परिषद शाळेत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. सदर प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी खासदार चिंतामण वनगा, आमदार पास्कल धनारे, जि.प. अध्यक्षा सुरेखा थेतले जि.प. सभापती धर्मा गोवारी, तलासरी पं.स. सभापती वनशा दूमडा उपसभापती भानुदास भोये, गटविकास अधिकारी राहुल धूम, गटशिक्षणाधिकारी कमळाकर सुतार सरपंच जसू भोये उपसरपंच रमेश घूटे, शाळेचे मुख्याध्यापक सोमनाथ भोये, विज्ञान मंडळ अध्यक्ष हेमंत अधिकारी आदी उपस्थित होते.
आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता आहे. आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रकल्पात संधी मिळाल्यास ते ही नवीन संशोधन करू शकतील. तसेच आदिवासी विभागाकडून अनेक योजना राबविल्या जातात त्याचा लाभ घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांनी आपला विकास साधावा असेही सवरा यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनउत्कर्ष प्रबोधिनी उध्वा संस्थेचे अध्यक्ष कैलास जाधव यांनी केले. या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभागातून २९, माध्यमिक विभागातून १६, शिक्षकांचे साहित्य ७, असे एकूण ५३ प्रकल्प मांडले असल्याचेही जाधव यांनी सांगितले. यावेळी सभापती वनशा दुमडा व शिक्षक संघटना कार्याध्यक्ष संतोष पावडे यांनी मार्गदर्शन केले. या प्रदर्शनात परिक्षणाचे काम राजू मोरे, जयंता पाटील व डॉ. राबड यांनी केले. (वार्ताहर)
>जिल्हा स्तरासाठी प्रकल्प निवड
प्राथमिक विभागातून १) आग सुचक यंत्र, लिटील चॅम्प उधवा, २) नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, जि.प. शाळा उधवा, ३) शेतकऱ्यांसाठी शितगृह, माध्यमिक विद्यालय तलासरी, ४) हरित विद्युतशक्ती, आश्रमशाळा गिरगाव
माध्यमिक विभागातून
१) दळव वळणासाठी सौर उर्जेचा वापर, जादीराणा हायस्कूल, २) स्मार्ट स्टडी लॅम्प, वेवजी हायस्कूल, ३) आपत्ती सुचक यंत्र, उपलाटा हायस्कूल, ४) सोलर संरक्षणित सिमा, झरी आश्रमशाळा