विद्यार्थ्याच्या आत्महत्येने यंत्रणेला आली जाग
By admin | Published: November 24, 2015 02:56 AM2015-11-24T02:56:55+5:302015-11-24T02:56:55+5:30
गणवेश आणि पुस्तकांसाठी पैसे नसल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची प्रशासकीय यंत्रणेने सोमवारी विचारपूस केली. ‘लोकमत’ने या प्रकरणाचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर
अकोला/रिधोरा : गणवेश आणि पुस्तकांसाठी पैसे नसल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची प्रशासकीय यंत्रणेने सोमवारी विचारपूस केली. ‘लोकमत’ने या प्रकरणाचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर, महसूल यंत्रणेने बाळापूर तालुक्याच्या दधम येथील या कुटुंबाची माहिती गोळा केली.
विशाल खुळे हा अकोला येथील महाराणा प्रताप खासगी विद्यालयात इयत्ता नववीत शिकत होता. शासनाची मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकाची योजना इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीच असल्याने त्याला या योजनेचा लाभ मिळाला नाही. मात्र, त्याला विद्यालयामार्फत प्रवासासाठी एसटी पास मिळाला होता. विद्यालय अनुदानित असल्याने शुल्काचाही प्रश्नच नव्हता. मात्र, सतत दोन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करताना त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावली. त्यामुळे गणवेश आणि पुस्तकांसाठी त्याच्या कुटुंबीयांकडे कोणतीही सोय नव्हती.
अखेर विशालनेच कंबर कसली. त्याने दिवाळीच्या सुट्टीमध्ये शेतमजुरी सुरू केली. त्याच्याकडे दोन विषयांची पुस्तके नव्हती. यासाठी त्याने मजुरी करून पैसे जमविणे सुरू केले. मात्र, दुसरीकडे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकटच होत गेल्याने, तो पुस्तकांची सोय करू शकला नाही. अखेर त्याने रविवारी विषारी औषध प्राशन केले. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर विशालच्या कुटुंबीयांची बाळापूरचे तहसीलदार समाधान सोळंके आणि तलाठी प्रशांत सायरे यांनी भेट घेतली. (लोकमत चमू)
विशाल होता दु:खी : आर्थिक परिस्थितीमुळे आवडत्या वस्तू मिळत नाहीत, ही बाब विशालला नेहमी बोचत असे. स्वत: शेतमुजरी करूनही नवीन कपडे तो विकत घेऊ शकला नाही. त्यामुळे तो निराश होता. एकूणच परिस्थितीमुळे तो खचला होता. परिणामी, त्याने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला.