शैक्षणिक खर्चाच्या चिंतेने विद्यार्थिनीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 07:52 AM2018-06-25T07:52:09+5:302018-06-25T07:52:25+5:30

आपल्या शिक्षणाच्या खर्चासाठी वडिलांची ओढाताण होते, या चिंतेतून ईश्वरवठार (ता. पंढरपूर) येथील अनिशा हनुमंत लवटे (17) हिने आत्महत्या केली.

Student's suicide in Pandharpur due to educational problem | शैक्षणिक खर्चाच्या चिंतेने विद्यार्थिनीची आत्महत्या

शैक्षणिक खर्चाच्या चिंतेने विद्यार्थिनीची आत्महत्या

Next

सोलापूर - आपल्या शिक्षणाच्या खर्चासाठी वडिलांची ओढाताण होते, या चिंतेतून ईश्वरवठार (ता. पंढरपूर) येथील अनिशा हनुमंत लवटे (17) हिने आत्महत्या केली. हनुमंत काशिनाथ लवटे यांना दोन मुली व एक मुलगा आहे. अनिशा ही पॉलिटेक्निकल कॉलेजला डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिकच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. शिक्षणाचा वाढता खर्च करताना वडिलांची होणारी ओढाताण अनिशाला बघवत नव्हती. त्यातून घरी पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपविले. आपण गेल्यावर आपली बहीण, भाऊ यांना वडील चांगले शिक्षण देतील, असे तिने चिठ्ठीत लिहिले आहे. आपल्या शिक्षणाचा खर्च वडील करू शकत नाहीत, असाही चिठ्ठीत उल्लेख आहे. 

पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार या गावात हनुमंत लवटे यांचं कुटुंब एक एकर शेतीवर आपली उपजीविका भागवतं. सलग दोन वर्षांचा दुष्काळ आणि त्यानंतर झालेली गारपीट यामुळे त्यांच्या एक एकर शेतीतील द्राक्षाची बाग जाळून गेली. यामुळे घरावरील कर्ज वाढत चाललं होतं. शेतीच्या अशा बेभरवशी व्यवसायामुळे लवटे यांनी आपल्या तिन्ही मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केलं होतं. त्यांची मोठी मुलगी सांगोल्यातील एका इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे, तर दुसरी अनिशा तासगाव येथे डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती.

लहान मुलगा देखील वारणा येथे शिकायला ठेवल्याने कुटुंबावर खर्चाचा ताण वाढला होता.  शेतीत झालेलं नुकसान, त्यामुळे वाढलेलं कर्ज यातच या तीनही मुलांच्या शिक्षणामुळे वडिलांवरील कर्ज वाढत असल्याची भावना अनिशाची झाली होती. यातूनच तिच्या फीच्या रकमेची व्यवस्था न झाल्याने कॉलेजला जाणं लांबत चाललं होतं. वडिलांची परवड असह्य झाल्याने अखेर अनिशाने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मृत्यूपूर्वी तिने शिक्षणाचा खर्च वडिलांना पेलवत नसल्याने आत्महत्या करत असून यास कोणाला जबाबदार धरु नये अशी चिठ्ठी लिहून ठेवली.

गरीब शेतकऱ्यांना आता मुलांचं शिक्षण हीच गुंतवणूक वाटू लागली आहे. कर्ज काढून आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी अशा कुटुंबाची धडपड सुरु असते. मात्र आई-वडिलांना पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी झालेला हा त्रास असह्य झाल्याने शेतकऱ्यांच्या मुलांना नैराश्य येतं. त्यामुळे सरकारी योजना आणि शिष्यवृत्ती यांसारख्या योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांना मिळाला तर अशा दुर्दैवी घटना होणार नाहीत.

Web Title: Student's suicide in Pandharpur due to educational problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.