उजनीच्या पाणलोटात विद्यार्थी बुडाला
By admin | Published: March 22, 2016 01:47 AM2016-03-22T01:47:11+5:302016-03-22T01:47:11+5:30
उजनी पाणलोट क्षेत्रात रविवारी (दि. २०) दुपारी पोहताना बुडालेल्या, इंदापूरच्या १५ वर्षे वयाच्या शाळकरी मुलाचा आज उशिरापर्यंत तपास लागला नाही
इंदापूर : उजनी पाणलोट क्षेत्रात रविवारी (दि. २०) दुपारी पोहताना बुडालेल्या, इंदापूरच्या १५ वर्षे वयाच्या शाळकरी मुलाचा आज उशिरापर्यंत तपास लागला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकाचे लोक उद्या सकाळी येतील, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
ओंकार संजय सरवणकर (वय १५, रा. अलंकार बिल्डिंग, नेहरू चौक, इंदापूर) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. तो पाण्यात बुडाल्याची माहिती त्याचे वडील संजय यशवंत सरवणकर यांनी पोलिसांना दिली.
याविषयी सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी सांगितले की, रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ओंकार खेळायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला, तो परतलाच नाही. त्यानंतर त्याचे मित्र रिझवान रफिक खान, अमन सादिक मोमीन, सैफुल मौला बागवान, वसीम अब्दुल नदाफ (सर्व रा. बागवान गल्ली, इंदापूर) यांनी सांगितले की, रविवारी दुपारी नारळ शोधण्यासाठी ओंकारसह हे सर्व जण शहा या गावी गेले होते. गावानजीक पाणलोट क्षेत्राजवळ ते सारे गेले. तेथे ओंकार कपडे व सँडल काढून पोहण्यासाठी पाण्यात उतरला. पाणी वेगात होते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला. हे पाहताच रिझवान त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उतरला; मात्र घाबरलेल्या ओंकारने त्यालाच पाण्यात ओढल्याने दोघे बुडू लागले. मुलांनी आरडाओरडा केला. तो ऐकून तेथे आलेल्या मच्छीमाराने रिझवानला पाण्याबाहेर ओढून काढले. तेवढ्या कालावधीत ओंकार पाण्यात बुडाला. तो दिसेनासा झाला. ही माहिती मुलांकडून समजल्यानंतर ओंकारच्या वडिलांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे ओंकारचे कपडे व सँडल आढळून आले. मच्छीमार व पोहणाऱ्यांनी शोध घेतला. रात्रभर तेथे थांबूनही ओंकारचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर सकाळी त्याच्या वडिलांनी पोलिसांना खबर दिली. शोध घेण्याची विनंती केली. आज दिवसभर शोधकार्य चालू होते. रात्री उशिरापर्यंत ओंकार सापडला नाही. उद्या सकाळी पुन्हा शोध घेतील, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी दिली. (वार्ताहर)