विद्यार्थ्यांना दिवाळी भेट !
By admin | Published: October 14, 2016 03:56 AM2016-10-14T03:56:20+5:302016-10-14T03:56:20+5:30
आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या सर्व समाजघटकांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य सरकारने आज विविध निर्णय घेत दिवाळीभेट दिली.
मुंबई : आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या सर्व समाजघटकांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य सरकारने आज विविध निर्णय घेत दिवाळीभेट दिली. वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपर्यंत असलेल्या समाजाच्या सर्व घटकांतील पालकांच्या पाल्यांची उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठीची शुल्क प्रतिपूर्ती आता राज्य शासन भरणार आहे. त्यासाठी राजर्षी शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजनेची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा यासाठी काही मूठभर लोक प्रयत्न करीत आहेत.
गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध शैक्षणिक सवलतींचे निर्णय घेण्यात आले. ईबीसीची मर्यादा वार्षिक एक लाख रुपये उत्पन्नावरून २.५० लाख इतकी करण्यात आली. या योजनेमुळे मराठा समाजाबरोबरच इतरही विद्यार्थ्यांना उच्च व व्यावसायिक शिक्षण घेताना आर्थिक भार पडणार नाही. एससी, एसटी व ओबीसी विद्यार्थ्यांनाच आतापर्यंत ही सवलत होती. आता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ओबीसींप्रमाणे ५० टक्के शुल्क प्रतिपूर्ती मिळेल. या योजनेचा लाभ शासकीय, शासन अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये उच्च व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांना यावर्षीपासूनच मिळेल.
अल्पभूधारक शेतकरी आणि मजुरांच्या मुलांना शहरात शिक्षण घेण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये (मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद) निवास व्यवस्थेसाठी वर्षाकाठी ३० हजार रुपये (दरमहा तीन हजार) तर जिल्ह्याच्या ठिकाणी २० हजार रु पये (दरमहा २ हजार रु.) यासाठी भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख योजना राबविण्यात येईल. साडेतीन लाख विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल.
वसतिगृहांमधील प्रवेशापासून वंचित आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात राहणे, जेवण आदीसाठी सहा हजार रुपये, मध्यम शहरात पाच हजार व लहान शहरात तीन हजार रुपये महिन्याकाठी देणारी पं.दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यात येईल. पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातील. येत्या मार्चपर्यंत तिन्ही योजनांसाठी १ हजार कोटींची तरतूद केली आहे.
समाजात तेढ निर्माण व्हावी यासाठी चुकीचे संदेश सोशल मीडियामध्ये पाठविले जात आहेत. एका समाजाने दुसऱ्या समाजाविरुध्द भूमिका घेऊ नये. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेले वर्तन सर्व समाज घटकांकडून झाले पाहिजे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.(विशेष प्रतिनिधी)