वडाळे तलावावर विद्यार्थ्यांची भटकंती

By admin | Published: April 7, 2017 02:25 AM2017-04-07T02:25:44+5:302017-04-07T02:25:44+5:30

ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असलेल्या पनवेलची एकेकाळी तलावांचे शहर म्हणूनही ख्याती होती.

Students' wandering on Wadale lake | वडाळे तलावावर विद्यार्थ्यांची भटकंती

वडाळे तलावावर विद्यार्थ्यांची भटकंती

Next

मयूर तांबडे,
पनवेल- ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असलेल्या पनवेलची एकेकाळी तलावांचे शहर म्हणूनही ख्याती होती. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष तसेच नियमित साफसफाई, स्वच्छतेच्या अभावामुळे बहुतांश तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. शहरातील वडाळे तलावाचे मध्यंतरी सुशोभीकरण करण्यात आले. तलावात रोटरी क्लबच्या सहकार्याने कृत्रिम तलाव बांधण्यात आला. मात्र कृत्रिम तलावामुळे याठिकाणी अपघातांची शक्यता वाढली आहे. तलावाच्या संरक्षण भिंतीवरून जवळच्या शाळेतील विद्यार्थी ये-जा करत करताना दिसतात. त्यामुळे जरासा तोल गेला तरी तो जीवघेणा ठरू शकतो. हे टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पनवेल शहरात वडाळे, कृष्णाळे, इस्त्रायली, लेण्डाले व देवाळे असे पाच तलाव आहेत. यापैकी वडाळे तलावात रोटरी क्लबने २०१६ मध्ये जवळपास १६ लाख रु पये खर्च करून गणेश मूर्तींच्या विसर्जनाकरिता कृत्रिम तलाव बांधण्यात आला. मात्र याठिकाणी बांधलेल्या भिंतीवर अनेकदा शालेय विद्यार्थी बसलेले दिसतात, तर काही विद्यार्थी बिनधास्त भिंतीवरून फिरत असल्याने तलावात पडून अप्रिय घटना घडू शकते. तलावाच्या शेजारी इंग्रजी व मराठी माध्यमाची शाळा आहे. शाळेत पाच ते सात हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पूर्वी शाळा सुटली की, विद्यार्थी तलावाच्या शेजारून चालत येत असत. मात्र वडाळे तलावात बांधलेल्या कृत्रिम तलावामुळे तलावाच्या मधोमध जाण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे. या भिंतीवर झाडांच्या कुंड्या उभ्या केल्या आहेत, तसेच लोखंडी गेटही उभारले आहे. असे असताना शाळेतील विद्यार्थी भिंतीवरून चालत पलीकडे जातात. कृत्रिम तलावात अजूनही पाणीसाठा असल्याने विद्यार्थी खाली पडून जखमी किंवा बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शाळेने तसेच पालकांनी विद्यार्थ्यांना तलावाच्या भिंतीवरून चालत न जाण्याच्या सूचना द्याव्यात, तसेच सुरक्षारक्षक नेमण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
दरवर्षी वडाळे तलावात शेकडो गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे तलावात मोठ्या प्रमाणात गाळ शिल्लक राहतो. याचाच विचार करून पनवेल रोटरी क्लबने वडाळे तलावात स्वच्छता, सुशोभीकरण राबविण्याचे ठरवले होते. त्यानुसार तलावात विसर्जन घाट बनविण्यात आला. हा घाट काँक्रीटचा नसून गाबीएल टेक्नॉलॉजीचा वापर करून बांधण्यात आला आहे. मात्र शाळा सुटल्यानंतर कृत्रिम तलावाच्या भिंतीवरून अनेक जण फिरताना दिसतात. विद्यार्थी शाळा सुटल्यावर मजा, मस्ती करण्यासाठी तलावाच्या बांधावर जातात. त्यामुळे कृत्रिम तलावात खाली पडून याठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेईल, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
>शाळेतील विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. वडाळे तलावातील कृत्रिम तलावाच्या संरक्षण भिंतीवर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र तरीही कुणी आढळल्यास, पालकांशी संपर्क करण्यात येईल.
- प्रल्हाद वाघमारे,
उपमुख्याध्यापक,
व्ही.के.हायस्कूल,
पनवेल

Web Title: Students' wandering on Wadale lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.