नीट पदव्युत्तर अभ्यासक्रमास आता ५ पर्सेंटाइलवर पात्रता, राष्ट्रीय परीक्षा मंडळाची नोटीस प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 17:01 IST2025-02-27T17:00:48+5:302025-02-27T17:01:51+5:30
सांगली : नीट पीजी-२०२४च्या परीक्षेत पाच पर्सेंटाइल गुण मिळविणारे विद्यार्थीदेखील आता पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायला पात्र ठरणार आहेत. राष्ट्रीय ...

नीट पदव्युत्तर अभ्यासक्रमास आता ५ पर्सेंटाइलवर पात्रता, राष्ट्रीय परीक्षा मंडळाची नोटीस प्रसिद्ध
सांगली : नीट पीजी-२०२४च्या परीक्षेत पाच पर्सेंटाइल गुण मिळविणारे विद्यार्थीदेखील आता पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायला पात्र ठरणार आहेत. राष्ट्रीय परीक्षा मंडळाने नुकतेच याबाबतची नोटीस प्रसिद्ध केली असून खुला गट, विमुक्त जाती, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि आर्थिकदृष्ट्या मागास आदी सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी या निर्णयाचा लाभ मिळेल.
दरवर्षी खुला गट व आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना ५० पर्सेंटाइल तर इतर सर्व राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४० पर्सेंटाइल गुणांची आवश्यकता असते.
याआधीही ४ जानेवारी २०२५ रोजी तिसऱ्या प्रवेश फेरीपूर्वी पात्रता टक्केवारी कमी करण्यात आली होती. खुल्या आणि आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना १५ पर्सेंटाइल तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १० पर्सेंटाइल गुण आवश्यक करण्यात आले होते. त्यानंतर आता चौथ्या फेरीनंतर हे पात्रता गुण आणखी कमी करण्यात आले आहेत. गतवर्षी अशाच पद्धतीने शून्य पर्सेंटाइल गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पात्र ठरविण्यात आले होते.
अनाटॉमी, फिजिओलॉजी, मायक्रोबॉयोलॉजीसारख्या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी फारसे इच्छुक नसतात, त्यामुळे अनेक राज्यांतील खासगी महाविद्यालयातील या विषयाच्या जागा रिक्त राहत असल्याने हे पात्रता गुण घटवणे भाग पडते. ज्या अभिमत विद्यापीठाची फी खूप अधिक आहे, अशा ठिकाणीही जागा शिल्लक राहतात. शेवटच्या टप्प्यात आता किती जागा शिल्लक राहतात, यावरून विद्यार्थ्यांना संधी मिळेल. -डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक, सांगली