विद्यार्थ्यांना मिळणार थेट घरपोच पुस्तके
By admin | Published: January 29, 2015 04:20 AM2015-01-29T04:20:38+5:302015-01-29T04:20:38+5:30
सुमारे सहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी संख्या आणि साडेचार हजार अभ्यास केंद्रे असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाची पुस्तके आता घरपोच मिळणार
संदीप भालेराव, नाशिक
सुमारे सहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी संख्या आणि साडेचार हजार अभ्यास केंद्रे असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाची पुस्तके आता घरपोच मिळणार आहेत.
पुस्तके वेळेत मिळत नसल्याची तक्रार त्यामुळे दूर होणार असून, विद्यार्थ्यांना अभ्यास केंद्राचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. कधी छपाई, तर कधी वाहतुकीच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांना पुस्तके वेळेत मिळत नाही. या दोन्ही यंत्रणा काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर मनुष्यबळाचे कारण दाखवून विभागीय केंद्रांकडून दिरंगाई करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या. काही विभागीय केंद्रांनी तर पुस्तके वितरणात दिरंगाई होत असल्याचे मान्य करताना मनुष्यबळ पुरविण्याची मागणी करीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितापेक्षा नोकरभरती करून आपले हितसंबंध जोपासण्याचीच संधी साधल्याची उदाहरणे आहेत.
पुस्तके वेळेत न मिळण्याचा प्रकार कमी करण्यासाठी विद्यमान कुलगुरूंनी पुस्तके थेट विद्यार्थ्यांच्या घरीच धाडण्याची योजना आणली आहे. टपालच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पुस्तके वितरित करण्यासाठीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार ३० कोटींची ४० लाख पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती वेळीच पडावी, यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.
मात्र वितरणाची व्यवस्था टपाल खात्यावर असल्याने विद्यापीठाला त्यांच्या यंत्रणेवरच अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे घरपोच पुस्तके देण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रयोगात विद्यापीठाची स्वत:ची अशी यंत्रणा नसल्यामुळे त्यातून अनेक प्रश्नही निर्माण होऊ शकतात.