विद्यार्थ्यांना पैसे नव्हे, पुस्तकेच मिळणार
By admin | Published: March 10, 2017 12:53 AM2017-03-10T00:53:27+5:302017-03-10T00:53:27+5:30
विद्यार्थ्यांना यापुढे विनामूल्य पाठ्यपुस्तकांऐवजी अनुदानाचे पैसेच दिले जातील, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र, अवघ्या दोन महिन्यांतच या निर्णयाचा फेरविचार
- अविनाश साबापुरे, यवतमाळ
विद्यार्थ्यांना यापुढे विनामूल्य पाठ्यपुस्तकांऐवजी अनुदानाचे पैसेच दिले जातील, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र, अवघ्या दोन महिन्यांतच या निर्णयाचा फेरविचार करण्याची वेळ शासनावर आली आहे. इतक्या कमी कालावधीत प्रत्येक विद्यार्थ्याचे बँक खाते काढणे आणि ते आधारशी जोडणे शक्य नसल्याची उपरती अधिकाऱ्यांना झाली असून यंदाही विद्यार्थ्यांना शाळेतूनच विनामूल्य पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत.
केंद्राच्या धोरणानुसार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेने विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्याऐवजी, तेवढी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात (डीबीटी) टाकण्याचा निर्णय घेतला होता. २०१७-१८ या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना पुस्तकाऐवजी पैसे मिळणार होते. त्यादृष्टीने दोन महिन्यांत प्रत्येक विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँक खाते काढून, ते आधारशी जोडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, अजूनही विद्यार्थ्यांची बँक खाती उघडण्याचे काम पूर्ण झालेले नाही. अनेक विद्यार्थ्यांची आधार नोंदणीही झाली नसल्याने हे काम २०१८-१९ या सत्रात होणार आहे.
‘एसएमएस’ आला, पत्रही येणार
आधार आणि बँक खात्यांचे काम पूर्ण न झाल्याने यंदा विद्यार्थ्यांना डीबीटीऐवजी पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील पाठ्यपुस्तकांची मागणी तयार ठेवा. येत्या चार-पाच दिवसांत अधिकृत पत्र मिळेल, असा एसएमएस वरिष्ठ पातळीवरून शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याला प्राप्त झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.