आकारिक, संकलित मूल्यमापनाने विद्यार्थी जाणार पुढच्या वर्गात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 02:11 AM2021-04-09T02:11:02+5:302021-04-09T07:26:24+5:30

इयत्ता पहिली ते आठवीसाठी निर्णय

Students will move on to the next class with a structured, compiled assessment | आकारिक, संकलित मूल्यमापनाने विद्यार्थी जाणार पुढच्या वर्गात

आकारिक, संकलित मूल्यमापनाने विद्यार्थी जाणार पुढच्या वर्गात

googlenewsNext

मुंबई : आकारिक आणि संकलित मूल्यमापन प्रक्रिया वापरून इयत्ता पहिली ते आठवीच्या तब्बल १ कोटी ४६ लाख ८६ हजार ४९३ विद्यार्थ्यांना वर्गोन्नती म्हणजे थेट पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) राज्यातील शाळा व स्थानिक प्रशासनांना दिले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही कारणास्तव वरील दोन्ही मूल्यमापन होऊ शकेलेले नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नत करावे आणि त्यांच्या प्रगतिपुस्तकावर आरटीई कायदा २००९ कलम १६ वर्गोन्नत असा शेरा नमूद करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय इतर कोणताही शेरा या विद्यार्थ्यांच्या प्रगतिपुस्तकावर देण्यात येऊ नये, असे एससीईआरटीने स्पष्ट केले.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात पहिली ते चौथीच्या शाळा प्रत्यक्ष सुरू करता आल्या नसल्या तरी शिक्षकांनी ऑनलाइन शिकवले. राज्याच्या बहुतांश ठिकाणी थोड्या महिन्यांकरिता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु करून तेथे प्रत्यक्ष शिक्षण झाले. दरम्यान, पहिली ते आठवीच्या अनेक शाळांमध्ये आकारिक मूल्यमापन केले गेले. काही शाळांनी संकलित मूल्यमापनही केले. या पार्श्वभूमीवर एससीईआरटीने या मूल्यमापन पद्धतींचा अवलंब करून विद्यार्थ्यांना वर्गोन्नती द्यावी असे म्हटले आहे. 

ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे फक्त आकारिक मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत आकारिक मूल्यमापनामधील विद्यार्थ्यांची क्षमता लक्षात घेता त्याचे रुपांतर १०० गुणांमध्ये करावे व त्यानुसार विद्यार्थ्याची श्रेणी निर्धारित करावी, अशा सूचना केल्या आहेत.
एससीईआरटीच्या या मार्गदर्शक सूचनांमुळे सर्व प्रकारच्या स्थलांतरित विद्यार्थ्यांनाही न्याय मिळू शकेल, असे मत शिक्षणतज्ज्ञांनी मांडले.

शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी कृती कार्यक्रम
एससीईआरटीकडून नमूद करण्यात आल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचे कोणत्याच प्रकारचे मूल्यमापन होऊ शकले नाही, त्यांच्या प्रगतिपुस्तकावर आरटीई शेरा असेल. मात्र, अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे, असे म्हटले आहे. तसेच एससीईआरटीकडून विकसित करण्यात आलेल्या विद्यार्थी मित्र पुस्तिकांची मदत घेण्यात यावी, सोबत नियमित वर्ग शिकवणीची प्रक्रियाही पूर्ण करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी एससीईआरटीई कृती कार्यक्रम तयार करणार असून, त्याच्या सूचना स्वतंत्र देण्यात येतील.

आकारिक व संकलित मूल्यमापन म्हणजे काय?
आकारिक मूल्यमापनामध्ये निरीक्षण हा महत्त्वाचा घटक असून, शाळांमध्ये वर्षभरात होणारे विविध उपक्रम, तोंडी परीक्षा, प्रकल्प, प्रयोग, वर्गकाम यांचे मूल्यमापन केले जाते. तर, संकलित मूल्यमापनामध्ये वर्षभरातील विद्यार्थ्यांच्या लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा यांचे मूल्यमापन केले जाते.

Web Title: Students will move on to the next class with a structured, compiled assessment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.