कामोठेमधील विद्यार्थ्यांची तारेवरची कसरत
By admin | Published: July 15, 2017 02:38 AM2017-07-15T02:38:17+5:302017-07-15T02:38:17+5:30
कळंबोलीवरून पळस्पे फाटा व जेएनपीटीकडे जाणाऱ्या रोडचे विस्तारीकरण सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कळंबोलीवरून पळस्पे फाटा व जेएनपीटीकडे जाणाऱ्या रोडचे विस्तारीकरण सुरू आहे. ठेकेदाराने योग्य खबरदारी घेतली नसल्याने कामोठेमधील केपीसी इंग्लिश हायस्कूलकडे जाणारा मार्ग बंद झाला असून, विद्यार्थ्यांना लाकडी फळीवरून उडी मारावी लागत आहे.
नवी मुंबई, पनवेलमधून जाणाऱ्या महामार्गांच्या रुंदीकरण व दुरुस्तीचे काम करताना नागरिकांच्या गैरसोयीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. सायन-पनवेल व मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा होत असताना आता कळंबोली ते पळस्पे फाटा व जेएनपीटीकडे जाणाऱ्या रोडवरील समस्याही वाढू लागल्या आहेत. कामोठेमध्ये महामार्गाला लागून केपीसी इंग्लिश हायस्कूल आहे. महामार्ग व शाळेच्या आवाराच्या मध्ये गटाराचे काम सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
रोडपासून गटाराची उंची जास्त आहे. यामुळे बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडी फळ्यांच्या आधारे पूल तयार करण्यात आला असून त्यावरून मुले शाळेच्या आवारामध्ये उडी मारत आहेत. पालकांना जीवावर उदार होऊन मुलांना त्या पुलावरून पलीकडे पाठवावे लागत असल्याचे चित्र शुक्रवारी पाहावयास मिळाले.
या परिसरामध्ये रोडचे काम सुरू असताना त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर अपघात होवून विद्यार्थी जखमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लाकडी फळी व तयार केलेली तात्पुरता रस्ता धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले जात असून अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.