भावी डॉक्टरांना रूग्णांवर उपचार करण्यापूर्वी रबरी पुतळ्यावर गिरवावे लागणार अभ्यासाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 11:49 AM2020-01-16T11:49:12+5:302020-01-16T11:51:21+5:30
वैद्यकीय महाविद्यालयात साकारतेय स्किल लॅब : एमसीआयच्या नियमांनुसार बंधनकारक
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना थेट रुग्णावर उपचार करण्याआधी मॅनेक्वीन(रबरी पुतळा) वर प्रात्यक्षिक करावे लागणार आहे. यासाठी डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्किल लॅब उभारण्यात येत आहे. या नव्या प्रयोगशाळेसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिकाला खूप महत्त्व असते. एखाद्या रुग्णावर प्रशिक्षित ज्येष्ठ डॉक्टर उपचार करत असताना त्यांचे विद्यार्थी ते पाहून शिकतात. जेव्हा प्रत्यक्ष उपचार करण्याची वेळ येते तेव्हा त्यांच्या हातून चूक होण्याची शक्यता असते. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक प्रशिक्षित करण्याची गरज आहे. हे ओळखून एमसीआयने (मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया) नियमामध्ये बदल केला असून, प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात स्किल लॅब उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रयोगशाळेमध्ये शरीरातील अवघड प्रक्रिया समजून त्यावर उपचार कोणते व कशा पद्धतीने करता येतील, याचे प्रशिक्षण मिळणार आहे.
एखाद्या रुग्णाचे हृदय बंद पडल्यानंतर एकालाच सीपीआर देता येतो. मात्र जर पुतळा असेल तर अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देता येते. पुतळ्यामध्ये त्या-त्या विभागाच्या गरजेनुसार कृत्रिम अवयव बसविण्यात येतात. यापूर्वी टाके घालण्याचे प्रशिक्षण हे उशीच्या माध्यमातून दिले जात होते.
आता यासाठी रबरी पुतळा वापरण्यात येणार आहे. या स्किल लॅबमध्ये टाके घालणे, कार्डियाक अरेस्ट आलेल्या व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत केले जाणारे प्रथमोपचार, इंजेक्शन देणे, घशामध्ये नळी टाकणे, लघवीसाठी नळी टाकणे, सलाईन लावणे आदींचे प्रशिक्षण या प्रयोगशाळेमध्ये देण्यात येणार आहे. या प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या प्रशिक्षित होण्याची संधी मिळणार आहे.
नव्याने १० मॅनेक्वीनसह इतर साहित्य आणणार
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध विभागांमध्ये यापूर्वी चार मॅनेक्वीन (पुतळे) होते. एमसीआयच्या नव्या नियमानुसार आम्ही स्वतंत्र स्किल लॅब उभारत आहोत. या लॅबमध्ये नव्याने १० मॅनेक्वीन व इतर साहित्य आणण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार प्रशिक्षण मिळावे हा यामागचा हेतू असल्याचे डॉ़ वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ़ पुष्पा अग्रवाल यांनी सांगितले़
लॅबमध्ये हे असणार ?
- - या लॅबमध्ये कमीत-कमी चार खोल्या असणार
- - एकावेळी विद्यार्थ्यांच्या छोट्या चमूला प्रात्यक्षिक दाखविणार
- - व्हिडिओ रेकॉर्डिंगची सेवा
- - १४ मॅनेक्वीन (रबरी पुतळे)
- - उपचाराचे प्रशिक्षण देण्यासाठी असणारे मॅनेक्वीन व इतर साहित्य ठेवण्यासाठी योग्य जागा
- - स्किल लॅब सांभाळणारे प्रशिक्षित कर्मचारी