वास्तुशिल्पी आणि नगर नियोजनकारांची तंत्रभाषा, दगड, सिमेंट, पोलाद, लाकूड अशा विविध पदार्थांचा सांगोपांग अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 05:51 AM2017-10-22T05:51:08+5:302017-10-22T05:51:20+5:30
वास्तुशिल्पींची भाषा ही त्यांनी काढलेल्या इमारतींच्या चित्रातून व्यक्त होते. या लोकांना बांधकामाची माहिती असावी लागते.
वास्तुशिल्पींची भाषा ही त्यांनी काढलेल्या इमारतींच्या चित्रातून व्यक्त होते. या लोकांना बांधकामाची माहिती असावी लागते. त्यामुळे गणित, भौतिकी असे विषय, दगड, सिमेंट, पोलाद, लाकूड अशा विविध पदार्थांचा सांगोपांग अभ्यास, स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग अशा अनेक विषयांचा अभ्यास करावा लागतो. पण इंजिनीअरिंगच्या या ज्ञानाबरोबरच त्यांना कलेच्या अंगानेही विचार करावा लागतो. मुख्यत: इमारतींचे सौंदर्य, लोकांच्या गरजा विचारात घेऊनही एकसारखी दुसरी इमारत न बांधता, प्रत्येकात काही नावीन्यता आणता येईल का हा विचार करावा लागतो. तर नगर नियोजनकारांना प्रत्येक नगराची गरज, उपलब्ध साधन सामग्री, त्या शहराची विशिष्ट छाप, तेथील हवामान, त्या शहरातील लोकांची मानसिकता या सर्वांचा विचार करावा लागतो आणि त्यानुसार नियोजन करावे लागते, नाहीतर ते नियोजन फसते आणि विनाकारण खर्च वाढतो. उदाहरणार्थ मुंबईतील वरळी येथे बांधलेल्या बहुमजली इमारतीत एवढ्या मोठ्या आकाराच्या खिडक्या दिल्या आहेत आणि तेथे समुद्र सान्निध्यामुळे भणभण वारे असल्याने त्या खिडक्या फारशा उघडता येत नाहीत. म्हणजे खिडक्या आहेत, पण उघडता येत नाहीत आणि भिंतीपेक्षा खिडक्या बनवण्याचा खर्च दुपटीने जास्त असल्याने घरे महाग झाली.