अडखळत वाटचाल

By Admin | Published: June 18, 2016 01:08 AM2016-06-18T01:08:49+5:302016-06-18T01:08:49+5:30

शिवसेनेच्या पन्नास वर्षांच्या वाटचालीचा धांडोळा घेता उत्तर महाराष्ट्र आणि त्यातही नाशिकमध्ये या संघटनेने प्रथमपासूनच जी घट्टपणे पाळेमुळे रुजविली त्याचे निर्विवाद श्रेय छगन भुजबळ

Stumbling | अडखळत वाटचाल

अडखळत वाटचाल

googlenewsNext

- किरण अग्रवाल (उत्तर महाराष्ट्र)

शिवसेनेच्या पन्नास वर्षांच्या वाटचालीचा धांडोळा घेता उत्तर महाराष्ट्र आणि त्यातही नाशिकमध्ये या संघटनेने प्रथमपासूनच जी घट्टपणे पाळेमुळे रुजविली त्याचे निर्विवाद श्रेय छगन भुजबळ यांनाच जाते. उत्तर महाराष्ट्रातील अन्य चार जिल्ह्यात मात्र शिवसेनेला फारसा जम बसवता आलेला नाही.

मुंबई बाहेरची पहिली शाखा उघडण्यापासून या संघटनेचा नाशिकशी संबंध जोडला गेलेला आहे. त्याचबरोबर मूळ नाशिककर असलेले छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या तिकिटावर मुंबईचे महापौर व पक्षाचे तत्कालीन एकमेव आमदार असा राजकीय प्रवास केल्याने त्यांच्या संपर्कातून नाशकातील संघटनेला बळ लाभले, जे भुजबळ पक्ष सोडून गेल्यानंतरही शिवसेनेने टिकवून ठेवले. १९९४ मध्ये या पक्षाचे चौथे अधिवेशन नाशकात झाले ज्याने ९५च्या विधानसभा निवडणुकीत विजयाचे व राज्यातील ‘युती’ सरकारच्या सत्तेचे दार उघडून दिल्याचे म्हणता येईल. त्यामुळे नाशकात हा पक्ष बऱ्यापैकी वाढला, पण खान्देशात व नगर जिल्ह्यात तो फारसा वाढू शकला नाही. ‘युती’च्या काळात उत्तर महाराष्ट्रातील नाशिकला बबनराव घोलप व सहयोगी सदस्य म्हणून तुकाराम दिघोळे असे दोन मंत्री लाभले होते. अहमदनगरमध्ये विखे-पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे बाळासाहेब विखे यांना केंद्रात तर राधाकृष्ण विखे व नगरचे अनिल राठोड यांना राज्यात ‘लाल दिवा’ लाभला होता. याखेरीज खान्देशात एकमात्र सुरेशदादा जैन यांना मंत्रिपद देण्यात आले होते. यातील विखे-पाटील सत्ता संपताच पक्ष सोडून गेल्याने तर सुरेशदादा कोर्ट-कचेऱ्यांत अडकल्याने नगर व जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला विकलांगता आली. राज्यातील सध्याच्या सरकारमध्येही केवळ दादा भुसे यांच्या रूपाने संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात एकमेव नाशिक जिल्ह्याला राज्यमंत्रिपद लाभले आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात तर या पक्षाला मातब्बर नेतृत्वच कधी लाभले नाही. त्यामुळे तेथे अपवादानेच सत्तेची संधी मिळाली व परिणामी पक्षाचा विकास होऊ शकला नाही.
मुंबईशी असलेल्या सलगतेमुळे व खुद्द शिवसेनाप्रमुखांनीही लक्ष पुरविल्यामुळे नाशकात पक्षबळ बऱ्यापैकी आकारास आले. नेत्यांबरोबर शिवसैनिक मोठ्या प्रमाणात घडले. त्यामुळे त्या बळावर राजाभाऊ गोडसे, अ‍ॅड. उत्तमराव ढिकले व विद्यमान अवस्थेत हेमंत गोडसे असे तीन खासदार या पक्षाला लाभले. नगर जिल्ह्यातही बाळासाहेब विखेंव्यतिरिक्त शिर्डी राखीव मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून बाळासाहेब वाकचौरे व त्यानंतरचे सदाशिव लोखंडे असे मिळून तीन खासदार निवडून आले. अर्थात या निवडींमागे संघटनात्मक बळाखेरीजची व्यक्तिगत कारणेच राहिली आहेत हा भाग वेगळा. परंतु जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात आजवर एकदाही या पक्षाला खासदारकी मिळवता आलेली नाही. आमदारकीच्या बळाचा विचार करायचा तर वर्तमान अवस्थेत उत्तर महाराष्ट्रात एकूण ४७ पैकी अवघ्या ८ जागा शिवसेनेकडे असून, त्यातीलही सर्वाधिक ४ नाशिक व ३ जळगाव जिल्ह्यातून निवडून आल्या आहेत. नगर जिल्ह्यातून एकच जागा असून, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात खाते उघडता आलेले नाही. मातब्बर नेतृत्वाचा अभाव हेच यामागील कारण राहिले आहे. धुळ्यातून प्रा. शरद पाटील वजा केले तर काही उरत नाही. जळगावात सुरेशदादा व गुलाबराव पाटील वगळता प्रभावी नेतृत्व नाही.

नेत्यांची
सोय, पण...
शिवसेनेच्या आजवरच्या वाटचालीत उत्तर महाराष्ट्रातून छगन भुजबळ, सुरेशदादा जैन, विखे पिता-पुत्र, प्रशांत हिरे आदि नेत्यांनी शिवसेनेच्या वळचणीला जाऊन पाहिले. कालांतराने यातील भुजबळ, विखे-पाटील, हिरे पक्ष सोडून गेले, पण भुजबळांचा अपवाद वगळता पक्ष म्हणून शिवसेनेच्या वाढीत त्यांचा काहीही हातभार लागला नाही. कारण मूलत: हे लोक त्यांची राजकीय सोय म्हणून काही काळाकरिता पक्षात आले होते.

Web Title: Stumbling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.