दारूविक्रेत्याचा मुलगा उपजिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2016 02:28 AM2016-04-07T02:28:12+5:302016-04-07T02:28:12+5:30
वडील गावठी दारू विकायचे. घरीही दारू पिऊन यायचे अन् मारायचे. घरची परिस्थती तशी हलाखीची. त्यात अधिकारी व्हायच्या जिद्दीने पछाडले, मामांनी मदत केली, पदवीचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर दररोज
पुणे : वडील गावठी दारू विकायचे. घरीही दारू पिऊन यायचे अन् मारायचे. घरची परिस्थती तशी हलाखीची. त्यात अधिकारी व्हायच्या जिद्दीने पछाडले, मामांनी मदत केली, पदवीचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर दररोज १६-१६ तास अभ्यास करून, अवघ्या २२ व्या वर्षी एका तरुणाने उपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षेत यश मिळवले. एवढेच नव्हे, तर रवींद्र राठोड याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवत, सर्वात
कमी वयात उपजिल्हाधिकारी पद मिळविले.
रवींद्रची निवड केवळ उपजिल्हाधिकारी पदासाठीच नाही, तर मंत्रालयातील सहायक कक्षाधिकारी आणि विक्रीकर निरीक्षक म्हणूनही झाली आहे. रवींद्र यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील जनुना या खेडेगावचा. घरात खाण्या-पिण्याचीही आबाळ. मात्र, आईने त्याला पाठबळ दिले. कठीण काळात त्याचे मामा निरंजन जाधव यांनी त्याला आर्थिक मदत केली. शिक्षण घेताना त्याने एमपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मनोहर भोळे यांनी त्याला मार्गदर्शन केले. त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. राज्यशास्त्र विषयात बीएचे शिक्षण घेत असताना, शेवटच्या वर्षी २०१४ मध्ये त्याने पहिल्यांदा एमपीएससीची पूर्वपरीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाला. त्यामुळे त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. मनावर दडपणही आले, आता मुख्य परीक्षा आणि मुलाखतीला सामोरे जायचे. जिद्द, चिकाटी आणि एकाग्रतेच्या जोरावर त्याने मुख्य परीक्षा आणि मुलाखत हे दोन्ही टप्पे यशस्वीपणे पार केले. (प्रतिनिधी)