उपराजधानीत सायबर गुन्ह्यांचा व्हायरस वाढतोय!
By admin | Published: January 9, 2017 04:29 PM2017-01-09T16:29:05+5:302017-01-09T16:29:05+5:30
सायबर क्राईम किंवा आयटी अॅक्टअंतर्गत २६८ गुन्हे दाखल झाले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे यातील ७० टक्के गुन्हे हे गेल्या २ वर्षांतील आहेत.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 9 : गेल्या ५ वर्षांमध्ये उपराजधानीत इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कॅशलेसच्या युगात आता ई-सेवा थेट मोबाईलपर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. युवापिढीसाठी तर इंटरनेट दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक आहे. परंतु ई-क्रांतीसोबतच सायबर क्राईमच्या प्रकरणांमध्येदेखील वाढ होत आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये नागपुरात सायबर क्राईम किंवा आयटी अॅक्टअंतर्गत २६८ गुन्हे दाखल झाले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे यातील ७० टक्के गुन्हे हे गेल्या २ वर्षांतील आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी शहरातील सायबर क्राईमसंदर्भात माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. २०१२ ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीत सायबर क्राईमचे किती गुन्हे दाखल करण्यात आले, किती आरोपींना अटक करण्यात आली हे प्रश्न त्यांनी विचारले होते. यासंदर्भात मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार जानेवारी २०१२ ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीत भादंवि, सायबर तसेच आयटी अॅक्ट मिळून एकूण २६८ गुन्हे दाखल करण्यात आले. २०१५ व २०१६ मध्ये यातील सुमारे ७० टक्के म्हणजेच १८८ गुन्ह्यांची नोंद झाली. दरवर्षी सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
सायबर गुन्ह्यांची वर्षनिहाय आकडेवारी
वर्ष गुन्हे
२०१२ १५
२०१३ १९
२०१४ ४६
२०१५ ९८
२०१६ (नोव्हेंबरपर्यंत)९०
१०३ गुन्हेगारांना अटक
माहितीच्या अधिकाराअंतर्गत प्राप्त झालेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षात ह्यसायबर क्राईमच्या गुन्ह्याअंतर्गत १०३ गुन्हेगारांना अटक करण्यात आली. गेल्या २ वर्षात हा आकडा ५० इतका होता.