उपअभियंत्यांनी केली पाहणी
By admin | Published: January 21, 2017 03:44 AM2017-01-21T03:44:01+5:302017-01-21T03:44:01+5:30
वाडा तालुक्यातील मानिवली येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला तडे गेले असून पत्रे तुटले आहेत.
वाडा : वाडा तालुक्यातील मानिवली येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला तडे गेले असून पत्रे तुटले आहेत. वर्गखोलीची दुरवस्था झाली असून दरवाजे, खिडक्या निघाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांुना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे. याबाबतचे वृत्त बुधवारच्या लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच बांधकाम प्रशासन खडबडून जागे झाले आणि गुरूवारी बांधकाम विभागाचे प्रभारी उपअभियंता विजय मोकाशी यांनी शाळेची पाहणी करून ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल दोन महिन्यापूर्वीच दिल्याची माहिती दिली.
जिल्हा परिषदेच्या या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग असून ३६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील वर्ग खोलीचे बांधकाम गेल्या २५ ते ३० वर्षापूर्वी करण्यात आले होते. या इमारतीला आता तडे गेले असून पत्र्यांना भोके पडली आहे. दरवाजे व खिडक्या निखळल्या आहेत. धोकादायक म्हणून घोषित केलेल्या या वर्गखोलीत दोन वर्षापासून विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिकत आहेत. लगतच्या दुसऱ्या खोलीत वर्ग भरवले जात आहेत. त्यांची दुरूस्ती करावी अन्यथा नवीन वर्गखोली बांधावी अशी मागणी शिक्षण प्रशासनाकडे ग्रामस्थांनी केली होती. मात्र तिच्याकडे प्रशासन गांभिर्याने बघत नव्हते. जर या बाबतचा अहवाल दोन महिन्यापूर्वी दिला तर संबंधित यंत्रणेने त्यावर काय कारवाई केली नसल्यास ती का झाली नाही? याचा खुलासा मात्र सार्वजनिक बांधकामने अद्याप केलेला नाही. (प्रतिनिधी)
>अहवाल देऊनही कारवाई का झाली नाही?
पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता विजय मोकाशी यांनी मानिवली शाळेला भेट देऊन पाहणी केली. धोकादायक इमारतीचा अहवाल गेल्या दोन महिन्यापूर्वीच शिक्षण विभागाला दिला.त्यांच्यासमवेत वाडा पंचायत समितीच्या सभापती मृणाली नडगे, उपसभापती माधुरी पाटील उपस्थित होत्या. त्यांनी या बाबतचा जाब त्यांना विचारला नाही.