उपराजधानीत दारुडया वाहनचालकाचा खाकीवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2016 11:48 PM2016-09-16T23:48:26+5:302016-09-17T00:24:41+5:30

दारू पिऊन वाहन चालविताना पकडलेल्या आरोपी दुचाकीचालकाने एका पोलीस हवालदाराला जबर मारहाण केली. या मारहाणीत वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार प्रकाश बारंगे गंभीर जखमी झाले.

Sub-maritime motorcycle attack blast | उपराजधानीत दारुडया वाहनचालकाचा खाकीवर हल्ला

उपराजधानीत दारुडया वाहनचालकाचा खाकीवर हल्ला

Next

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १६  : दारू पिऊन वाहन चालविताना (ड्रंक न ड्राईव्ह) पकडलेल्या आरोपी दुचाकीचालकाने एका पोलीस हवालदाराला जबर मारहाण केली. या मारहाणीत वाहतूक शाखेचे (उत्तर विभाग) पोलीस हवालदार प्रकाश बारंगे (वय ४५) गंभीर जखमी झाले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे पोलीस दलात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

बारंगे यांचे सहकारी हवालदार मोहन रेवतकर यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री संत्रा मार्केट परिसरात वाहतूक शाखेचे पोलीस ड्रंक न ड्राईव्हची कारवाई करीत होते. आरोपी श्रीकांत ऊर्फ सूर्यकांत अरुण व्यास (रा. माता कचेरी वसाहतीजवळ) स्प्लेंडरवर ट्रीपल सिट येताना दिसल्याने हवालदार रेवतकर आणि बारंगे यांनी त्याला थांबवले. तो दारूच्या नशेत तर्र असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी त्याला लायसेन्ससह ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली. त्यानंतर हवालदार बारंगे यांनी दोन आरोपींना तर रेवतकर यांनी एकाला दुचाकीवर बसवले तसेच पोलीस ठाण्याकडे निघाले. रामझुल्याजवळच्या नटवर सलूनजवळ आरोपींनी दुचाकीवरून उडी मारून पळ काढला. त्यामुळे बारंगे यांनी दुचाकी थांबवून आरोपी व्यासचा पाठलाग करून त्याला पकडले.

यावेळी आरोपी व्यासने बाजूचा दगड उचलून बारंगे यांना डोक्यावर मारणे सुरू केले. एकापाठोपाठ अनेक वार केल्यामुळे हवालदार बारंगे रक्ताने न्हाऊन निघाले. ते खाली कोसळल्यानंतर आरोपी पळून गेला. मागून आलेल्या रेवतकर यांना हा प्रकार दिसताच त्यांनी अन्य एका पोलीस शिपायाच्या मदतीने बारंगे यांना गंभीर अवस्थेत मेयोत नेले. दरम्यान, कंट्रोल रूम आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती देण्यात आली. त्यानंतर सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी, वाहतूक शाखेच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी मेयोत जाऊन बारंगे यांची भेट घेतली. डॉक्टरांशीही चर्चा केली.
या घटनेने पोलीस दलात तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, आरोपी व्यासच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली होती.

दोन दिवसात दुसरा हल्ला
नागपुरात खाकीवर झालेला दोन दिवसातील दुसरा तर पाच दिवसातील चवथा हल्ला आहे. गुरुवारी तुषार वर्मा नामक आरोपीने एपीआय इंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण केली होती. तर, सोमवारी कळमन्यातील एपीआय पवार यांना रजत असुफा व रमन असुफा नामक आरोपींनी मारहाण केली होती. ११ सप्टेंबरला आरोपी मुकेश मते याने पोलीस शिपाई श्याम नरुले यांना मारहाण केली होती. 

खासगी रुग्णालयात हलविले
मध्यरात्री १२ च्या सुमारास बारंगे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मेयोतून रामदासपेठेतील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या हल्ल्याची वार्ता शहर पोलीस दलात वायुवेगाने पसरली. त्यामुळे पोलीस बांधवांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.

Web Title: Sub-maritime motorcycle attack blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.