डिस्चार्जपूर्वी सुबियाला दिली मुलीच्या मृत्यूची वार्ता
By admin | Published: March 7, 2016 03:42 AM2016-03-07T03:42:32+5:302016-03-07T03:42:32+5:30
‘अल्लाला तुझ्याकडून चांगले काम करून घ्यायचे असेल. त्यामुळेच या भीषण हत्याकांडात केवळ तुझा जीव वाचला. तूच नशीबवान आहेस,’ अशा शब्दांत पोलीस आणि नातेवाइकांनी सुबियाला विश्वासात घे
ठाणे : ‘अल्लाला तुझ्याकडून चांगले काम करून घ्यायचे असेल. त्यामुळेच या भीषण हत्याकांडात केवळ तुझा जीव वाचला. तूच नशीबवान आहेस,’ अशा शब्दांत पोलीस आणि नातेवाइकांनी सुबियाला विश्वासात घेतल्यानंतर पाच महिन्यांची मुलगी अल्फीया हिचा मृत्यू झाल्याची माहिती शनिवारी रात्री दिली. त्यानंतर बराच वेळ तिने आक्रोश करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. सुबियाला खासगी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
एक आठवड्यापूर्वी घडलेल्या या भीषण हत्याकांडातून वाचलेल्या सुबियावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या मुलीचा याच हत्याकांडात मृत्यू झाला. परंतु, तिला आणखी मानसिक धक्का बसू नये, या कारणास्तव तिला तिच्या मुलीच्या मृत्यूची बातमी दिली नव्हती. गेल्या एक आठवड्यापासून सुबिया पोलीस आणि पती सोजब भरमार यांच्याकडे वारंवार मुलीची विचारपूस करीत होती. वागळे इस्टेट विभागाचे पोलीस उपायुक्त विलास चंदनशिवे यांनी तिला विश्वासात घेत ‘तुला आता खंबीर व्हावे लागेल. पुढे समाजासाठी तुझ्याकडून चांगले काम होणार असेल. त्यामुळेच इतक्या गंभीर जखमी अवस्थेतही तुला हसनैनचा प्रतिकार करून बेडरूमला आतून कडी लावता आली. त्यामुळे तू नशीबवान आहेस,’ असे म्हणत तिला ही दु:खद वार्ता दिली. त्यानंतर प्रकृतीची पुन्हा तपासणी करून तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. (प्रतिनिधी)