सुभाष मैदानात गर्दुल्ल्यांचा अड्डा
By admin | Published: August 23, 2016 04:01 AM2016-08-23T04:01:50+5:302016-08-23T04:01:50+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या सुभाष मैदानाची दुरवस्था झाली आहे.
मुरलीधर भवार,
कल्याण- कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या सुभाष मैदानाची दुरवस्था झाली आहे. त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तेथील प्रेक्षक गॅलरीत बेकायदा व्यवसाय सुरू आहे. गर्दुल्ल्यांचा अड्डा झाला आहे. महापालिकेसोबत पोलिसांचेही दुर्लक्ष होत असल्याची ओरड क्रीडाप्रेमींकडून होत आहे.
मैदानात भरपूर गवत उगवले आहे. ते काढून मैदान खेळासाठी मोकळे करण्याची तसदीही महापालिकेला घ्यावीशी वाटत नाही. त्या ठिकाणी काही बैलगाडीवाले गवत चरण्यासाठी बैलांना सोडतात. एका बाजूला मातीचा ढिगारा पडून आहे. मैदानाभोवती असलेल्या जॉगिंग ट्रॅकचे काही ठिकाणचे दिवे गायब झाले आहेत. काही ठिकाणी मैदानात पाण्याचे तळे साचले असून दीड फुटापर्यंत खड्डा पडला आहे. अनेक जण मैदानाभोवती असलेल्या ट्रॅकच्या बाजूला बसण्यासाठी असलेल्या बाकांवर दुपारी चक्क वामकुक्षी घेतात.
मैदानातील प्रेक्षक गॅलरी म्हणजे डम्पिंग ग्राउंड झाले आहे. त्या ठिकाणी असलेल्या एका खोलीत गर्दुल्ल्यांनी आपले बस्तान बसवले आहे. दुपारच्या वेळेत ही मंडळी गायब होतात. रात्रीच्या अंधारात येथे बेकायदा व्यवसाय सुरू असतात. दुपारच्या वेळेत दोन तरुण नशा करत होते, तर दोन तरुण दारू पीत होते. या ठिकाणी महाराष्ट्र क्रिकेट स्पोर्ट्स अकादमीला जागा दिली आहे. ते कार्यालय बंद आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना कट्टा दिला आहे. प्रेक्षक गॅलरीच्या खालच्या खोल्यांमध्ये काही भंगारचे सामान भरले आहे. गॅलरीच्या छताचे पत्रे तुटले आहे. लोखंडी अँगल्स गंजलेले आहेत. सुभाष मैदानात महापालिकेने सुरक्षारक्षक नेमलेले नाहीत. स्थानिकांनी यासंदर्भात बाजारपेठ पोलिसांकडे तक्रारी केलेल्या आहेत. त्याची दखल पोलिसांकडून घेतली जात नसल्याची ओरड या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
>निधी केवळ कागदावरच
व्हीनस स्पोटर््स अकादमीचे ईश्वरचंद्र कुमुद यांनी सांगितले की, सुभाष मैदानावर खेळ खेळले जावेत, अशी अपेक्षा आहे. त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. महापालिका मुख्यालयाच्या शेजारी असलेल्या मोठ्या मैदानाची ही दुरवस्था आहे. तर, अन्य मैदानाची काय स्थिती असेल, याची कल्पना केलेली बरी. महापालिकेने अर्थसंकल्पात कोट्यवधींची तरतूद मैदान सुसज्ज करण्यासाठी केलेली आहे. सुभाष मैदानाची दुरवस्था पाहून हा निधी केवळ कागदावर असल्याचे दिसते.