सुबियाने ‘दावत’ला दिला होता नकार
By admin | Published: March 1, 2016 02:36 AM2016-03-01T02:36:06+5:302016-03-01T02:36:06+5:30
वडवली गावातील हत्याकांडातून बचावलेल्या एकमेव साक्षीदार आणि मुख्य आरोपी हुसनैन वरेकरची बहीण सुबियाला आपल्या भावाकडे ‘दावत’साठी यायचे नव्हते.
जितेंद्र कालेकर/डिप्पी वांकाणी, ठाणे
वडवली गावातील हत्याकांडातून बचावलेल्या एकमेव साक्षीदार आणि मुख्य आरोपी हुसनैन वरेकरची बहीण सुबियाला आपल्या भावाकडे ‘दावत’साठी यायचे नव्हते. परंतु, भाऊ (हुसनैन) घ्यायला दारात येऊन उभा राहिला असताना तुला जायला काय हरकत आहे, असे थोरल्या जाऊने सांगत आग्रह केल्याने सुबियाने मृत्यूच्या दारात नेऊन ठेवणाऱ्या त्या ‘दावत’ला हजेरी लावली. दैव बलवत्तर म्हणून वाचलेल्या सुबियाच्या निकटवर्तीयांनी ही माहिती दिली.
भिवंडीच्या महापोली येथील रहिवासी असलेली सुबिया जोसेफ भारमल (२२) या बहिणीला घ्यायला हुसनैन रिक्षाने गेला होता. परंतु, तिने काही कारणास्तव या ‘दावत’साठी नकार दिला होता. यावरून, बहीण-भावात वादही झाला. परंतु, भाऊ नाराज होईल. शिवाय, तो थेट घरी घ्यायला आला आहे. त्याला नकार देण्यापेक्षा तू त्याच्याबरोबर जा, असेही सुबियाच्या मोठ्या जावेने सांगितले. त्यामुळे काहीशा नाखुशीने ती तयार झाली.
दावत देण्याच्या निमित्ताने सर्वांना आपल्या घरी बोलावून त्यांचे गळे चिरणाऱ्या हुसनैनच्या त्या
नरसंहाराची सुबिया ही एकमेव साक्षीदार आहे. हुसनैनने तिच्यावरही वार केला. तिचा गळाही त्याने चिरला. मात्र, सुबियाच्या सुदैवाने कुटुंबातील अन्य व्यक्तींची श्वासनलिका ज्याप्रमाणे कापली गेली, तशी तिची कापली गेली नाही.
गळ्याला मोठी जखम झाली असतानाही हुसनैनचा प्रतिकार करीत सुबिया बेडरुममध्ये पळाली व तिने आतून कडी लावून घेतली आणि स्वत:चा जीव वाचवण्याकरिता लोकांचा धावा केला. सुबिया ‘दावत’ला न येण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहिली असती तर आज तिची अशी अवस्था झाली नसती. कदाचित, तिची लहानगी मुलगीही न आल्याने वाचली असती.
सुबिया हुसनैनच्या तावडीतून सुटली, त्यामुळेच कदाचित आता आपण जिवंत राहिलो तर सुबिया पोलिसांना सर्व हकिकत सांगेल, या भीतीने हुसनैनने गळफास लावून आत्महत्या केलेली असू शकते. सुबिया हल्ल्यात मरण पावली असती तर कदाचित हे हत्याकांड करून तो फरार झाला असता, असे पोलिसांचे मत आहे. (प्रतिनिधी)
> याआधीही भाईजानकडून धमकी!
सुबियावर सध्या पोलीस संरक्षणात ठाण्याच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथे केवळ तिच्या चुलतीबरोबर ती सोमवारी बोलली. या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाच्या बाहेर महिला पोलीस तैनात
आहेत. उसका दिमाख सरक गया था. इसके पहले भी ‘सबको मार डालूँगा’, असे तो एकदोन वेळा बोलल्याचे सुबियाने तिच्या चुलतीला सांगितले.
मेरी बेटी कहा है?
सुबियाकडे जाणाऱ्यांना ती ‘मेरी बेटी कहा है?’ असे विचारते. इतर काही माहिती विचारण्याचा प्रयत्न केल्यावर ती छताकडे एक टक पाहत राहते. त्यामुळे अजूनही तिच्याकडून अधिकृत माहिती मिळाली नसल्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सांगितले.
सध्याचे घर अन्वरच्या मेहुण्याचे
अन्वर वरेकर (हुसनैनचे वडील) यांचे कुटुंब वास्तव्याला असलेली वडवलीतील घराची जागा ही त्यांच्या मेहुण्याने अर्थात बहिणीच्या नवऱ्याने दिल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.
> हत्याकांडातील बळींना महासभेची श्रद्धांजली
ठाणे : घोडबंदर येथील कासारवडवली गावातील हत्याकांडाचे पडसाद सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतही उमटले. महापालिकेची सर्वसाधारण सभा १५ मिनिटांसाठी तहकूब करून या हत्याकांडात बळी पडलेल्या कुटुंबीयांसह या बातमीचे वृत्तांकन करताना निधन झालेले कॅमेरामन रतन भौमिक यांनादेखील श्रद्धांजली वाहण्यात आली.हुसनैन वरेकर या माथेफिरूने आपल्या घरातील आई, वडील, मुली, बहिणी आणि भाचे अशा तब्बल १४ जणांची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर, स्वत:ही गळफास घेऊन स्वत:ला संपवले. देशात अशा प्रकारे आपल्याच कुटुंबातील १४ जणांना संपवल्याच्या घटनेने ठाणे हादरले आहे. हुसनैनची बहीण या हल्ल्यातून बचावल्याने या दुर्घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना झाली. तसेच एकापाठोपाठ एक निघणारे १४ जणांचे मृतदेह पाहण्याची दुर्दैवी वेळ वरेकर कुटुंबीय राहत असलेल्या गावकऱ्यांवर आली. या घटनेने ठाण्यातील प्रत्येक घरात मयत झालेल्या लोकांबद्दल सहानुभूती असल्याने शिवसेनेचे गटनेते संतोष वडवले आणि नगरसेवक नरेश मणेरा यांनी सभा तहकुबी मांडली होती. सुरुवातीला पूर्ण दिवसाची सभा तहकुबी मांडण्यात आली होती. तिला विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी अनुमोदन दिले. परंतु, त्यानंतर स्थायी समिती सदस्यपद आदी महत्त्वाचे आणि तातडीचे विषय कार्यक्रमपत्रिकेवर असल्याने सभागृह नेत्या अनिता गौरी यांनी १५ मिनिटे सभा तहकूब करून श्रद्धांजली वाहण्याची सूचना केली. त्यानुसार, या हत्याकाडांत बळी गेलेल्यांना दोन मिनिटे उभे राहून सभागृहातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी श्रद्धांजली वाहिली.