संपाचे प्रतिज्ञापत्र सादर करा
By admin | Published: June 19, 2015 03:08 AM2015-06-19T03:08:30+5:302015-06-19T03:08:30+5:30
रिक्षा-टॅक्सी युनियनने दोन दिवस पुकारलेल्या संपाची दखल घेत उच्च न्यायालयाने गुरुवारी संघटनेला संपाचा खुलासा करणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.
मुंबई : रिक्षा-टॅक्सी युनियनने दोन दिवस पुकारलेल्या संपाची दखल घेत उच्च न्यायालयाने गुरुवारी संघटनेला संपाचा खुलासा करणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.
गेल्या महिन्यात राज्य शासनाने जाहीर केलेल्या रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी शासनाने न्यायालयात अर्ज केला. या अर्जावरील सुनावणीत उदय वारूंजीकर यांनी रिक्षा-टॅक्सीने पुकारलेल्या संपाची माहिती न्यायालयाला दिली.
२०१३ मध्ये न्यायालयाने रिक्षा-टॅक्सी युनियनला संप न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे १५ व १७ जूनचा संप हा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे. याप्रकरणी योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी अॅड. वारूंजीकर यांनी केली. ती मान्य करत न्यायालयाने वरील आदेश दिले.
भाडेवाढीचा खुलासा करणारे प्रतिज्ञापत्र शासनाने सादर न केल्याने न्यायालयाने यासाठीही शासनाला येत्या मंगळवारपर्यंतची मुदत दिली व ही सुनावणी तहकूब केली.