एमईटीचा तपासाचा अहवाल सादर करा
By Admin | Published: August 23, 2016 06:33 AM2016-08-23T06:33:47+5:302016-08-23T06:33:47+5:30
माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट (एमईटी) गैरव्यवहाराप्रकरणी आतापर्यंत काय तपास करण्यात आला?
मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट (एमईटी) गैरव्यवहाराप्रकरणी आतापर्यंत काय तपास करण्यात आला? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने विशेष तपास पथक व सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दोन आठवड्यांत तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
भुजबळ कुटूंबियांनी एमईटीच्या ११७ कोटी रुपयांच्या संपत्तीचा व ट्रस्टला मिळणाऱ्या निधीचा वापर खासगी कारणांसाठी केल्याने याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी एमईटीचे सहसंस्थापक सुनील कर्वे यांनी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे होती.
सोमवारच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी एमईटीने बेकायदा संपादित केलेला भूखंड सरकारने ताब्यात घेतल्याची माहिती खंडपीठाला दिली. मात्र एमईटीच्या संपत्तीचा आणि निधीचा वापर खासगी कारणांसाठी करण्यात आल्याच्या आरोपावर धर्मदाय आयुक्तच निर्णय घेऊ शकतील, असेही सरकारी वकिलांनी स्पष्ट केले. याचिकाकर्त्यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी त्यास विरोध केला. त्यावर उच्च न्यायालयाने एसआयटीने काय तपास केला आहे, अशी विचारणा करत दोन आठवड्यांत अहवाल देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)