मुरूड दुर्घटनेचा अहवाल दोन दिवसांत सादर करा
By admin | Published: February 5, 2016 04:03 AM2016-02-05T04:03:26+5:302016-02-05T04:03:26+5:30
आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या वतीने मुरुड -जंजिरा येथे आयोजित करण्यात आलेल्या सहली दरम्यान १२ विद्यार्थी बुडून मृत्युमुखी पडल्याच्या घटनेचा अहवाल
पुणे : आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या वतीने मुरुड -जंजिरा येथे आयोजित करण्यात आलेल्या सहली दरम्यान १२ विद्यार्थी बुडून मृत्युमुखी पडल्याच्या घटनेचा अहवाल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दोन दिवसांत सादर करावा, असे आदेश पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाताना महाविद्यालय प्रशासनाने सर्व नियमांचे पालन केले होते का, हे स्पष्ट होणार आहे.
सहलीला जाण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) व राज्य शासनाने काही नियमावली तयार केली आहे. तिचे पालन महाविद्यालयाकडून करण्यात आले होते का, तसेच विद्यार्थी व शिक्षकांना याबाबत कल्पना देण्यात आली होती का, या गोष्टींची माहिती घेण्यासाठी उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने अहवाल मागविला आहे. त्याबाबतचे पत्र विद्यापीठाच्या कुलसचिव कार्यालयास बुधवारी पाठविण्यात आले आहे.
विभागीय सहसंचालक डॉ. विजय नारखेडे म्हणाले, दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, याबाबतचा चौकशी अहवाल येत्या दोन दिवसांत सादर करावा, असे पत्र विद्यापीठाला पाठविण्यात आले आहे. विद्यापीठाने चौकशी अहवाल सादर करताना महाविद्यालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या सहलीचे स्वरूप व उद्दीष्ट काय होते, सहलीला जाण्यासाठी पालकांची व विद्यार्थ्यांची पूर्वपरवानगी घेतली होती का, महाविद्यालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीचे पालन केले होते का, महाविद्यालयाने किंवा संस्थेने बैठक घेऊन सहली संदर्भात नियोजन केले होते का, सहली दरम्यान दुर्घटना घडू नये यासाठी संंस्था व महाविद्यालयाकडून कोणती खबरदारी घेण्यात आली होती, या बाबतचा तपशील चौकशी अहवालात असेल, असेही नारखेडे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)