शालेय पोषण आहार धान्य वितरणाचा अहवाल सादर करा; शिक्षण संचालकांचा राज्यातील शाळांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 08:16 PM2020-04-06T20:16:53+5:302020-04-06T20:27:40+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विद्यार्थ्यांंना शालेय पोषण आहार मिळत नसल्याची माहिती समोर आली होती.
पुणे: शालेय पोषण आहार योजने अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील शाळा स्तरावर शिल्लक तांदूळ, डाळी, कडधान्य विद्यार्थ्यांना वितरित केल्याचा 6 एप्रिलपर्यंतचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विद्यार्थ्यांंना शालेय पोषण आहार मिळत नसल्याची माहिती समोर आली होती . त्यामुळे शालेय पोषण आहारता दिल्या जाणाऱ्या तांदळाचे व कडधान्याचे वाटप ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये करावे, असे आदेश राज्य शासनातर्फे देण्यात आले होते. 'कोरोना' मुळे मार्च महिन्यातच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. त्याचप्रमाणे इयत्ता पहिलीपासून ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात नव्हता. सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती.त्यामुळे राज्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांसह खासगी शाळा, हंगामी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात दिले जाणारे धान्य वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 27 मार्च रोजी शिक्षण संचालक कार्यालयाने शाळेचे मुख्याध्यापक योजनेचे काम पहाणारे शिक्षण व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य यांना विद्यार्थ्यांना धान्य वाटप करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
धान्य वाटप करताना शाळेत गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच प्रत्येक विद्यार्थी व पालकांना वेळा ठरवून द्याव्यात. धान्य वाटप करण्यासाठी शाळेत आलेल्या पालकांमध्ये एक मीटरचे सामाजिक अंतर असले पाहिजे,अशाही सूचना शासनाने दिल्या होत्या.त्यानुसार किती शाळांमधील शिल्लक धान्याचे किती विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले, या संदर्भातील 6 एप्रिलपर्यंतचा अहवाल येत्या मंगळवारपर्यंत (दि 7) सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.
.................