पाणी अडवा पाणी जिरवा

By Admin | Published: June 19, 2016 01:46 AM2016-06-19T01:46:13+5:302016-06-19T01:46:13+5:30

जर समाजात फूट असेल, गावात जर भांडणे असतील तर ते भांडेही गळकेच असेल नि पाणी त्यात जमा होणार नाही. मात्र गाव समाज जर एकसंध असेल तर ते भांडेही अखंड असून त्यात

Submit water to water | पाणी अडवा पाणी जिरवा

पाणी अडवा पाणी जिरवा

googlenewsNext

- सत्यजीत भटकळ

जर समाजात फूट असेल, गावात जर भांडणे असतील तर ते भांडेही गळकेच असेल नि पाणी त्यात जमा होणार नाही. मात्र गाव समाज जर एकसंध असेल तर ते भांडेही अखंड असून त्यात पावसाचे पाणी जमा होत राहील. हे समजवण्यासाठी खेळ आणि नाटक या माध्यमांचा पुरेपूर वापर करण्यात आला. ज्यामुळे कंटाळवाणी भाषणे झाली नाहीत आणि अत्यंत चैतन्यपूर्ण वातावरणात प्रशिक्षण पार पडले.

शिबिरादरम्यान या पाणलोट विकासाचे उपचार कोणकोणते आहेत, कोणत्या ठिकाणी कोणते उपचार करायचे आणि प्रत्येक उपचार कसा करतात, याचे प्रशिक्षण ग्रामस्थांना हडळफच्या माध्यमातून देण्यात आले.

पाणी अडवा पाणी जिरवा किंवा माती अडवा पाणी जिरवा या घोषणा बऱ्याच जुन्या आहेत. मग प्रश्न असा उद्भवतो की या घोषणांवर अंमलबजावणी का झाली नाही. पाणी अडवून का जिरवले गेले नाही? एक प्रमुख कारण आहे ते हे की पाणी अडवण्यासाठी, जिरवण्यासाठी गावात एकी होणे खूप गरजेचे आहे.

नेहमीच आपण पाणी जिरवण्याऐवजी एकमेकांना जिरवण्यात अधिक रस घेतला. आपण एकमेकांना पाण्यात पाहत राहिलो आणि ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही निवळ घोषणा म्हणून राहिली. ही परिस्थिती बदलावी, गावात एकी निर्माण होऊन पाणलोट विकासाचे कामे व्हावे यासाठी सत्यमेव जयते वॉटर कपचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचा आधार होता प्रशिक्षण. भाग घेणाऱ्या प्रत्येक गावाला ५ ग्रामस्थ प्रशिक्षणाला पाठविणे बंधनकारक होते. प्रशिक्षणाचे दोन प्रमुख भाग होते. पहिला भाग होता तो तांत्रिक प्रशिक्षणाचा - ज्यात पाणलोट विकासाचे विज्ञान शिकवण्यात आले. पाणी अडवा नि जिरवा सांगणे सोपे आहे परंतु ते नेमके कसे करावे याचा अभ्यास करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. WOTR नावाची संस्था या क्षेत्रात तीन दशकांपेक्षा अधिक काळापासून काम करीत आहे. WOTR च्या इंजिनीअर्सनी ही जबाबदारी सांभाळली.
हे प्रशिक्षण पूर्णपणे प्रॅक्टिकल होते. त्यात लेक्चरबाजी अजिबात नव्हती. निरीक्षणातून, कृतीतूनच शिकायचे होते. प्रशिक्षणासाठी आम्ही अशा गावांची निवड केली होती जिथे पाऊस अत्यंत कमी पडला होता तरी ती गावे पाण्याच्या बाबतीत समृद्ध होती. कारण त्या गावांनी पाणलोट विकासाची कामे वैज्ञानिक पद्धतीने केली होती.
पहिल्याच दिवशी प्रशिक्षणार्थी यजमान गावाची शिवार फेरी करीत असत. त्या शिवारफेरीत त्यांना विहिरीतील पाणी दिसे, मे महिन्यात चालणारी शेती दिसे, गावातील समृद्धी दिसे. त्याचबरोबर यजमान गावात झालेले जलसंधारणाचे लहान मोठे उपचारही दिसत असतात. कमी पावसातही पाणलोट विकासामुळे गाव पाणीदार असू शकते याबद्दल त्यांची खात्री पटत असे.
कमी पावसातही पाणलोट विकासामुळे गाव पाणीदार असू शकते याबद्दल त्यांची खात्री पटत असे. मग पाणलोट विकासाचे उपचार कोणकोणते आहेत, कोणत्या ठिकाणी कोणते उपचार करायचे आणि प्रत्येक उपचार कसा करतात हे पुढच्या तीन दिवसांत शिकवले जात असे. काही उपचार ते स्वत: शिबिरादरम्यान निर्माण करत असत. तर बाकी उपचार कसे करतात ते फिल्म्स आणि प्रश्नोत्तरामार्फत शिकवले जात असे. प्रशिक्षणाचा एक भाग तांत्रिक होता, तर दुसरा भाग होता सामाजिक. गाव समाजाला एकत्र आणण्याचे महत्त्व असे समजावले जात असे. थोडक्यात काय तर ‘माती अडवा पाणी जिरवा’ म्हणजे काय करायचे? एवढेच न सांगता ते कसे करायचे यावर आम्ही सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून भर दिला. जवळजवळ ८०० प्रशिक्षणार्थी आपापल्या गावी गेले. ते प्रशिक्षण काळात जे जे शिकले ते त्यांनी आपापल्या ग्रामस्थांना सांगितले. त्यानंतर हजारो ग्रामस्थांनी एकत्र येऊन जलसंधारणाचे प्रचंड काम केले. नियोजनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व कामे ही ग्रामास्थांनीच केली. शेतकरीच इंजिनीअर होता, शेतकरीच श्रमकरी होता. पाऊस येईल तेव्हा मातीही अडेल, पाणीही जिरेल. आणि याचे पूर्ण श्रेय प्रशिक्षित होऊन आलेल्या शेतकऱ्याचेच असेल.

(जून महिन्याचे मानकरी असलेले लेखक प्रसिद्ध दिग्दर्शक असून पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

Web Title: Submit water to water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.