सुब्रतो रॉयना दिलासा
By admin | Published: June 7, 2017 05:17 AM2017-06-07T05:17:35+5:302017-06-07T05:17:35+5:30
सहारा इंडियाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांना आरोपमुक्तता अर्ज दाखल करण्यास विशेष सेबी न्यायालयाने मनाई केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सहारा इंडियाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांना आरोपमुक्तता अर्ज दाखल करण्यास विशेष सेबी न्यायालयाने मनाई केली होती. विशेष न्यायालयाचा हा आदेश मंगळवारी उच्च न्यायालयाने रद्द करत रॉय यांना दिलासा दिला. परंतु आजच आरोपमुक्तता अर्ज दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने रॉय यांना दिले आहेत.
सुब्रतो रॉय यांना हजर राहण्याचा आदेश देऊनही ते सुनावणीच्यावेळी न्यायालयात हजर न राहिल्याने विशेष न्यायालयाने त्यांना प्रत्येक सुनावणीस हजर राहण्याचे निर्देश दिले. तसेच त्यांच्यामुळे आरोप निश्चित करता येत नसल्याने त्यांना आरोपमुक्ततेचा अर्ज करण्यास मनाई केली. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला रॉय यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. आपल्याला आपल्या अधिकारांपासून वंचित ठेवण्यात येत आहे, असे रॉय यांनी याचिकेत म्हटले आहे. न्या. राजेश केतकर यांच्यापुढे या याचिकेवर सुनावणी होती.
सुनावणीत रॉय यांचे वकील अशोक सरोगी यांनी यापुढे रॉय सुनावणीस हजर राहतील, असे आश्वासन न्यायालयाला दिले. ‘रॉय सुनावणीस हजर राहतील तसेच बुधवारी आरोप निश्चितीसंदर्भात विशेष न्यायालयात युक्तिवाद करू,’ असे आश्वासन सरोगी यांनी न्यायालयाला दिले.
‘आरोप निश्चितीसंदर्भात युक्तिवादाला सुरूवात करा.
परंतु, बुधवारीच आरोपमुक्ततेसाठी अर्जही करा,’ असे निर्देश देत न्यायालयाने विशेष न्यायालयाचा आदेश रद्द केला.